बिबटय़ाच्या कातडय़ासह दोघांना राजुऱ्यात अटक Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
 लगतच्या आंध्रप्रदेशातील आसिफाबाद येथून राजुरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या विरूर येथे बिबटय़ाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सोमा हनुमंतू जाभोर (५०) व मोहन तुकाराम रत्नम या दोघा जणांना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह नुकतीच अटक केली.
विरूर येथील मोहन रत्नम हा बिबटय़ाची कातडी घेऊन जाणार असल्याची माहिती वनखात्यातील अधिकाऱ्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर वनाधिकाऱ्यांनी विरूर मार्गावर सापळा रचला असता मोहनला कातडय़ासह अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता आपल्यासोबत आणखी एक साथीदार असल्याचे सांगितले. त्याबाबत त्याला अधिक विचारले असता त्याने सोमा जाभोर याचे नाव सांगितले. सोमा हा आंध्रप्रदेशातील आसिफाबाद येथील रहिवासी आहे. यानंतर सोमालाही अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याजवळून बिबटय़ाचे एक कातडे जप्त करण्यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी .बी.मेडपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांनी केली. विशेष म्हणजे,
या जिल्हय़ात शिकारी टोळय़ा सक्रीय असल्याचे पुरावेच या घटनेतून मिळाले आहेत.