बुलढाण्यात माकड टोळ्यांच्या उपद्रवाने नागरिक भयभीत Print

हल्ल्यात १२ जखमी, वनखाते ढिम्म
 बुलढाणा/प्रतिनिधी
नजीकच्या जंगलात अन्न व पाण्याची वानवा असल्याने काही दिवसांपासून माकडांच्या टोळ्या शहरात घुसल्या असून त्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. या माकडांनी शहरातील तीन पोलिसांसह बाराहून अधिक नागरिकांना चावून जखमी केले आहे. या माक ड टोळ्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यास बुलढाणा वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे कार्यालय निष्क्रीय ठरले आहे.
 शहरात गेल्या सहा महिन्यापासून माकडांनी धिंगाणा घातला आहे. संभाजी नगरात माकडांनी हैदोस घालून शास्त्रीबुवासह पाच सहा जणांना जखमी केले. नजीकच्याच पोलीस मुख्यालयात माकडांनी पोलीस कर्मचारी संजय गवई, राहुल शिंदे, विलास सुर्यवंशी, रघुनाथ लक्ष्मीनारायण यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यांना बुलढाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाऊस अवर्षण व वृक्षतोडीमुळे  नजीकच्या अजिंठा पर्वतराजीच्या जंगलात वन्यप्राण्यांसाठी अन्न व पाण्याची मारामार आहे. त्यामुळे या माकडांच्या टोळ्या शहरात आल्या असून शहरातील फळ व भाजी वर्गीय वृक्षावर, तसेच घरांच्या गच्च्यांवर त्यांचे आक्रमण वाढले आहे. गच्चीवर वाळवणांसाठी ठेवलेले अन्नधान्य या टोळ्या फस्त करतात. त्यांना अडवणाऱ्या नागरिकांवर चावा घेऊन हल्ला करतात. या  टोळ्यांकडे वनखात्याचे संपूर्ण दुर्लक्ष आहे. शहरातील दहा बारा नागरिकांवर हल्ले झाल्यानंतर वनविभागाला जाग आली. वन विभागाचे एक पथक या माकडांना जेरबंद करण्यासाठी गेल्यावर माकडांनी त्यांना वाकुल्या दाखवून पलायन केले. माकडाचे साधे पिल्लूही पकडण्यास वनखात्याला यश आलेले नाही. माकडांच्या वाढत्या उपद्रवाने वनखात्याच्या राणी बगीच्यातही नागरिक व पर्यटक त्रस्त झाले आहेत.