नागपूर-पुणे मार्गावर दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा बसगाडय़ा धावणार Print

नागपूर / प्रतिनिधी
दिवाळीच्या सुटीत पुणे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत जादा बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
पुण्यात शिक्षण घेत असलेले नागपुरातील विद्यार्थी, तसेच आय.टी.सह इतर क्षेत्रांमध्ये नोकरी करणारे कर्मचारी हे दिवाळीसाठी मोठय़ा संख्येत नागपूरला येत असतात. त्यामुळे रेल्वे व खाजगी ट्रॅव्हल्स यांचे आरक्षण फार आधीच ‘फुल्ल’ होते. प्रवाशांच्या निकडीचा गैरफायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्सचे मालक नेहमीच्या प्रवासभाडय़ात भरमसाठ वाढ करून २ ते अडीच हजार रुपयांपर्यंत भाडे आकारतात. त्यामुळे नागपूर व पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना मोठी अडचण जाणवते. त्यांची गर्दी लक्षात घेऊन गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही एसटीने या मार्गावर जादा बसगाडय़ांची व्यवस्था केली आहे.
यावर्षी नागपूरहून पुण्यासाठी ७ ते ११ नोव्हेंबपर्यंत, तर पुण्याहून नागपूरसाठी ८ ते १२ नोव्हेंबरपर्यंत निमआराम (आशियाड) बसगाडय़ा चालवण्यात येणार आहेत. या कालावधीत नागपूरहून पुण्यासाठी बसगाडय़ा सुटण्याची वेळ दररोज सकाळी ६, ७, ८ व ९ वाजता राहणार असून, पुण्याहून दररोज सायंकाळी ६.२०, ६.४०, ७.२० आणि ७.४० वाजता नागपूरसाठी बसगाडय़ा सुटतील. या फेऱ्यांव्यतिरिक्त दिवाळी संपल्यानंतर नागपूरहून पुण्याच्या परतीच्या प्रवासासाठी १५ नोव्हेंबरपासून जादा बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूर- पुणे तसेच पुणे-नागपूर बसचे भाडे ८९३ रुपये आहे. दिवाळीच्या जादा फेऱ्यांव्यतिरिक्त नागपूर- पुणे मार्गावर दुपारी १ व ४ आणि सायंकाळी ५ व साडेसहा वाजता नियमित फेऱ्या सुरू आहेत. या सर्व फेऱ्यांच्या ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी गणेशपेठ येथील मुख्य बसस्थानकावर २७२६२२१ किंवा २७२६१४२ या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा बसस्थानक प्रमुखांशी ९६०४१९५३०९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.