भंडारा अर्बन बॅंकेला यंदा चार कोटींचा नफा |
![]() |
भंडारा / वार्ताहर दि. भंडारा अर्बन को.ऑप. बँकेने २०११-१२ या वर्षांत े ३.३९ कोटी रुपये नफा मिळविला आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या ग्राहकांकरिता अनेक सोयी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड.जयंत वैरागडे यांनी भंडारा अर्बन बँकेच्या ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. अॅड.जयंत वैरागडे यांनी बँकेच्या गेल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. तसेच दरवर्षी उत्तरोत्तर नफ्याचा उच्चांक भंडारा को.ऑप. बँकेने कसा गाठला याची माहिती दिली. ते आपल्या भाषणात म्हणाले की, बॅंकेने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक डाटा सेंटर उभारले. छोटे उद्योग, व्यावसायिक व ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. अॅक्सीस बॅंकेशी करार करून एन.ई.एफ.टी.व आर.टी.जी.एम. या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा फायदा बँकेचे ग्राहक मोठय़ाप्रमाणावर घेत आहेत. भंडारा अर्बन बँकेच्या लवकरच सर्व शाखांमध्ये एटीएम मशीन लावण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा बँकेच्या ग्राहकांना घेता येणार आहे. या सभेत एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली गेली. सभेचे कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर भजे यांनी सांभाळले. या सभेत सहकार, तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा तसेच दहावी, बारावीच्या शालांत परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांचा व बॅंकेच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. |