देवरीच्या तहसीलदारांनी वसूल केला ५० हजारांचा महसूल Print

नागपूरच्या डी. ठक्कर कंपनीचे तीन टिप्पर जप्त
गोंदिया/वार्ताहर
रविवारी दुपारी २ वाजता देवरीच्या तहसीलदारांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून पाऊलदौना ते सिरपूर रस्त्यावर अवैधरीत्या गिट्टी आणि मुरुमांची चोरी करीत असताना डी. ठक्कर कंपनीचे ३ टिप्पर पकडले.
एमएच ३४ एबी ४३२६, एमएच एबी ४५८८ या दोन टिप्परमध्ये अवैधप्रकारे गिट्टी भरलेली आढळली, तर एम.एच. २७ झेड २२२६ ट्रकमध्ये अवैध मुरुम भरलेला होता. डी. ठक्कर कंपनीमार्फत सिरपूर येथे आरटीओ चेकपोस्टचे काम सुरू असून त्याकरिता हे अवैध उत्खनन करून मालाची वाहतूक करीत होते.
देवरी तहसीलदार प्रताप वाघमारे व नायब तहसीलदार आर.डी.पटले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ही कारवाई केली. यावेळी नागपूरच्या डी. ठक्कर कंपनीकडून अंदाजे ५० हजार रुपयाचा महसूल वसूल केल्याची माहिती मिळालेली आहे.