राष्ट्रहितासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक -बोराळकर Print

बुलढाणा/प्रतिनिधी
दुर्जन शक्ती पुरातन काळापासून आजपर्यंत सज्जन शक्तीच्या विरोधात ठामपणे उभी राहिली आहे. असे असतांनाही सज्जन शक्ती दुर्जन शक्तीवर सतत विजय मिळवित आली आहे. या प्रक्रियेतून थोर समाजसुधारक अण्णा हजारे, योगगुरू बाबा रामदेव यांनाही जावे लागले. त्यांच्या विरोधातही काही दुर्जन शक्ती आहेतच. अशा दुर्जनशक्तीला वेळीच प्रतिकार करणे आवश्यक आहे. यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मेहकर जिल्हा संघचालक शांतीलालजी बोराळकर यांनी केले.
जानेफळ संघ शाखेच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख व्यक्ते म्हणून ते बोलत होते.  संघावर तीन वेळ तत्कालीन सरकारने बंदी लादली. काय गुन्हा आहे संघाचा? राष्ट्रप्रेम शिकविणे व भारतीय संस्कृतीचे धडे शिकविणे हा गुन्हा ठरतो का? तत्कालीन सरकारला नंतर संघावरील बंदी मागे घ्यावी लागली. हा सज्जन शक्तीचा विजयच आहे.
विद्यमान शिक्षण पध्दती ही तरुणांची दिशाभूल करणारी आहे. यातून सुशिक्षित बेरोजगारच निर्माण होतात. याविरोधात जनजागृती  आवश्यक असून हे काम संघ करीत आहे. राष्ट्राला परमवैभवाला पोहोचविण्याचे काम संघ करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी मेहकर तालुका संघचालक डॉ. धनराज राठी, नगर कार्यवाहक नीळकंठ अजबे उपस्थितीत होते, तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सिंचन अधिकारी अशोक घाटे होते.