गावाचा विकासासाठी महिलांनी संघटित व्हावे -अ‍ॅड. गोस्वामी Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
गावाचा विकास साधायचा असेल तर महिलांनी पुढाकार घेऊन संघटन शक्ती निर्माण केली पाहिजे, असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष  अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयात दत्तक घेतलेल्या मुरसा या गावाला ग्रामविकास प्रकल्प समितीच्या अंतर्गत बचत गटातील महिलांच्या उद्योगाविषयी व महिलांच्या विकासाकरिता महिला मार्गदर्शन मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गावाच्या सरपंच काशी बोढाले होत्या. याप्रसंगी बोढाले यांनी प्रकल्पामार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली व महाविद्यालयाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महिलांनी संघटित होण्यासोबतच दारूबंदी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, बचत गटाच्या माध्यमातून उद्योजगतात विकास साधावा जेणेकरून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करता येईल. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांनी प्रास्ताविकातून मुरसा गावाने मागील दहा वर्षांत राबवलेल्या विविध कार्यक्रमांचा व उपक्रमांचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक  ममता ठाकुरवार यांनी केले, तर आभार प्राध्यापक देवेंद्र बोरकुटे यांनी मानले. मेळाव्याचे आयोजन ग्रामविकास प्रकल्प यांनी केले. या कार्यक्रमाकरिता प्राध्यापक सुभाष गिरडे, महाविद्यालयाचे विद्यार्थी, गावातील महिला व ग्रामस्थांनी सहकार्य केले. यावेळी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक, शाळा समितीचे अध्यक्ष संजय कामतवार, बोढाले गुरूजी उपस्थित होते.