यवतमाळच्या ‘राजलक्ष्मी’ला आदर्श पतसंस्था पुरस्कार Print

अमरावती / प्रतिनिधी
विदर्भ क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् फेडरेशनच्यावतीने विदर्भस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार स्पर्धा अमरावती येथे नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत सहकार क्षेत्रातील अग्रेसर राजलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेला सतत पाचव्या वर्षी आदर्श पतसंस्था पुरस्कार आमदार रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक एस.एल. भोसले, विदर्भ फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप राजूरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रकाश काळबांडे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक मारोतराव मेंढे, ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ जगदीश किल्लोळ, विधितज्ज्ञ सुभाष पारखी उपस्थित होते. यवतमाळच्या ‘राजलक्ष्मी’ मल्टीस्टेटने प्राप्त केलेले यश जिल्ह्य़ाच्या सहकार क्षेत्राकरिता उल्लेखनीय व विक्रम प्रस्थापित करणारे ठरले आहे. या संस्थेने वॉटर हार्वेस्टिंग, पल्स पोलिओ, आरोग्य शिबीर, वृक्ष संवर्धन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, सर्वधर्म विवाह सोहळे आयोजित करण्यात सहभाग घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष अरविंद तायडे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष राधेश्याम गुप्ता, सचिव रमेश खटी, व्यवस्थापकीय संचालक डी.जी. तांबेकर, संचालक , कर्मचारी व अभिकर्त्यांनी परिश्रम घेतले.