‘सूरमयी श्याम’ला उत्स्फूर्त प्रतिसाद Print

वर्धा / प्रतिनिधी
कोजागिरीच्या पर्वावर येथील जय महाकाली शिक्षण संस्थेत आयोजित ‘सूरमयी श्याम’ या संगीतमय मेजवानीस रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला.अग्निहोत्री विद्या संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिध्द भोजपुरी गायिका भारती सिंग (अलाहाबाद) व मुंबईचे गझलगायक उस्ताद आजमअली यांच्या गायनाचा हा बहारदार कार्यक्रम आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर सुरू झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री व चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष धुन्नू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसिध्द गझलगायक जगजितसिंग यांच्या विविध रंगातील गझल प्रारंभी सादर करण्यात आल्या. या गझलांना रसिकांनी वन्स मोअर करून दाद दिली. गायिका भारती सिंग यांनी कृष्णगीत, भोजपुरी गीत व हिंदी चित्रपटातील गीते सादर केली. भोजपुरी शैलीतील गीतांना श्रोत्यांनी वारंवार टाळ्या वाजवून पसंती दिली. कोजागिरीनिमित्तच्या ‘सूरमयी श्याम’ या कार्यक्रमास रात्र होत असतांनाही उत्तरोत्तर प्रसिसाद मिळत गेला. रईसखान, प्रिंस राज व नौशाद यांनी वाद्यसंगत दिली होती. कार्यक्रमास माजी आमदार वसंतराव कार्लेकर, उद्योजक मोहन अग्रवाल, सचिन अग्निहोत्री, प्राचार्य डॉ. एस. कुमार, डॉ. अशोक जैन, प्रदीप बजाज कवी इमरान राही यासह शहरातील अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन श्रीकांत नायक यांनी केले.