टाकाऊ धातूपासून विविध देवतांच्या मूर्ती Print

गोंदिया / वार्ताहर
घरातील टाकाऊ वस्तूंचा उपयोग अनेकदा आपण घरातील एखाद्या कामासाठी करतो किंवा त्याला भंगारात विकतो, मात्र याच टाकाऊ वस्तूंवर प्रक्रिया करून दैनंदिन वापरातील वस्तू निर्मितीचे काम अनेक उद्योगधंद्यात केले जाते. हीच बाब हेरून घरातील भंगारात पडलेले पितळ, जर्मन वा लोखंडी साहित्यापासून विविध देवदेवतांच्या सुंदर मूर्ती तयार करण्याचे कार्य कर्नाटकातील सरवन खान व ताक खान हे दोघे करीत आहेत.
हे काम वर्षांतील ठराविक महिन्यातच होत असले तरी, या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या व्यवसायासंदर्भात खानबंधूंनी सांगितले, हा आमचा पारंपरिक व्यवसाय असून आमच्या समाजातील अनेक लोक या व्यवसायात गुंतले आहेत. कर्नाटकसह परिसरातील राज्यातही आपण साधारणत हिवाळ्यात व्यवसाय करीत असून तेथील नागरिकांचाही आपल्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गावोगावी फिरून नागरिकांच्या घरात भंगार अवस्थेत पडलेले जुने पितळी भांडे, जर्मन तारा वा खराब झालेल्या धातूंना वितळवून त्यापासून विविध देवदेवतांच्या मूर्ती बनविण्याचे काम ते करतात.  
धातूला कोळशाच्या लहान भट्टीत वितळवून देवदेवतांच्या मूर्तीच्या साच्यापासून या मूर्त्यां तयार होतात. या मोबदल्यात साधारणत एका मूर्तीसाठी शंभर ते दीडशे रुपये ते घेतात. यासाठी अध्र्या फुटाची मूर्ती तयार होण्यासाठी त्यांना जवळपास २० ते ३५ मिनिटे लागतात. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये या मूर्तीचे खास आकर्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या व्यवसायातून दिवसाला साधारणत: पाचशे ते हजार रुपयाचा आपला व्यवसाय होत असला तरी, उन्हाळा व पावसाळ्यात काम जवळपास बंद राहते. असे असले तरी वर्षभरासाठीचा पसा हिवाळ्यातच जमा करण्याचे आपले प्रयत्न राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.