चंद्रपुरातील बकाल स्मशानभूमींचे लवकरच होणार सौंदर्यीकरण Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
मृत्यूनंतर इहलोकीचा मार्ग सुसहय़ व्हावा, यासाठी महानगरपालिकेने ५० लाख रुपये खर्च करून शहरातील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अतिशय वाईट अवस्था झालेल्या शांतीधाम, पठाणपुरा व बायपासवरील स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.
 पंचशताब्दी वर्षांनिमित्त महानगरपालिकेने शहराच्या सौदर्यीकरणासोबतच स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरण करण्याचे कामही हाती घेतले आहे. या कामाला अधिक पैसा लागेल म्हणून बिनबा प्रभागातील शांतीधाम स्मशानभूमीची अवस्था अतिशय वाईट झालेली होती.
शहरातील घाण, तसेच मेलेली जनावरे याच भागात आणून टाकण्यात येत असल्याने अतिशय दरुगधी वातावरण येथे होते. त्यामुळे मृतदेह आणतांना लोकांना अनेक त्रासाला तोंड द्यावे लागत होते. जिवंतपणी तर माणसाला यातना भोगाव्याच लागतात, परंतु मृत्यूनंतर या मार्गाने नेले तर त्या वेदना याहीपेक्षा अधिक होत्या, असे लोक विनोदाने म्हणायचे. त्यामुळे महानगरपालिका व पदाधिकाऱ्यांवर बरीच टीकाही झाली.
केवळ शांतीधाम स्मशानभूमीच नाही, तर पठाणपुरा व बायपासवरील स्मशानभूमीचीही अशीच वाईट अवस्था झालेली आहे. दाताळा मार्गावरील स्मशानभूमीचे शेड तर अज्ञात इसमांनी पाडून टाकले. त्यामुळे आता तेथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. शहरातील स्मशानभूमींची ही वाईट अवस्था लक्षात घेत स्थायी समितीच्या बैठकीत  ५० लाख रुपयाचा निधी स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी वेगळा काढण्यात आला. त्यातून आता हे  सौंदर्यीकरण केले जाणार आहे.  यात २० लाख रुपये खर्च करून शांतीधाम स्मशानभूमीचे  सौंदर्यीकरण केले जाणार आहे.  त्या पाठोपाठ पाच लाख रुपयातून पठाणपुरा व पाच लाख बायपासवरील स्मशानभूमीवर खर्च केला जाणार आहे. पावसाळ्यात स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शेडची बांधणी केली जाणार आहे. शांतीधाम स्मशानभूमीवर वृक्षारोपणासोबतच सौंदर्यीकरणात ५० सिमेंट बेंच व इतर आवश्यक सुविधा सुध्दा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पावसाळ्यात या परिसरात पाणी साचत असल्याने तेथील रस्त्यांची दूरवस्था  झालेली आहे. या रस्त्यांची कामे या माध्यमातून होणार आहेत.