गोंदिया जिल्ह्य़ातील भूमाफियांच्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष Print

तलाव व बोडय़ा नामशेष होण्याच्या मार्गावर
गोंदिया / वार्ताहर
तलावाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्य़ातील प्रत्येक शहरात व गावखेडय़ात तलाव व बोडय़ांची बरीच संख्या आहे, मात्र आज स्थानिक रहिवासी, तसेच भूमाफियांनी या तलाव व बोडय़ांवर अतिक्रमण  करणे   सुरू   केले आहे. त्यामुळे हे तलाव व बोडय़ा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्याच आशीर्वादाने हा हा प्रकार सुरू असल्याचा आरोप जिल्हावासीयांकडून होत आहे.
जिल्ह्य़ातील आठही तालुक्यात ९५६ गावे असून लहान गावात एक दोन तरी लहान मोठे तलाव असून मोठय़ा गावात तीन ते पाच बोडय़ांची संख्या आहे. या तलाव व बोडय़ांमधील पाणीसाठय़ामुळे भूगर्भातील जलसाठा स्थिर राहत असल्याने काही वर्षांपूर्वी ग्रामीण नागरिकांना उन्हाळात पाणी टंचाईचा सामना करावा लागत नव्हता. त्याचप्रमाणे शेतशिवारातील तलाव व बोडय़ांमधील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी होत होता, मात्र आता या बोडय़ा व तलावांवर भूमाफियांची नजर व स्थानिक नागरिकांचे अतिक्रमण वाढल्यामुळे त्या  नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्य़ाचे प्रमुख पीक असलेल्या धान पिकासाठी सिंचन व्यवस्था म्हणून मोठे प्रकल्प असले तरी त्याचा पाहिजे त्या प्रमाणात शेतीला उपयोग होत नाही. परिणामी, शेतशिवारातील तलाव, बोडय़ा वा नाल्यातील पाण्यापासून मोठा प्रमाणात सिंचन केले जात होते, मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांंपासून अनियमित पावसामुळे तलाव व बोडय़ांतील पाणीसाठय़ात घट झाल्याने शेतकऱ्यांचे सिंचनाचे हे स्रोतही कुचकामी ठरू लागले आहेत. पावसाळ्याव्यतिरिक्त हे तलाव व बोडय़ा कोरडय़ा राहतात. हीच स्थिती गावशिवारातील   तलाव   व बोडय़ांची असल्याने गावातील भूगर्भातील  जलसाठा    आटत    असून दरवर्षी भीषण   पाणी    टंचाईचा    सामना    करावा   लागत आहे.
यावर तोडगा म्हणून शासनातर्फे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ कार्यक्रमांतर्गत अनेक योजना ग्रामीण भागात राबविल्या, मात्र या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी नीट होत नसल्याने गाव व शेतशिवारात वर्षांनुवष्रे असलेल्या तलाव व बोडय़ांना या कार्यक्रमातूनही नवसंजीवनी मिळत नसल्याचे लक्षात येते. एकंदरीतच सिंचन व पाणी टंचाईच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या तलाव व बोडय़ांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा फायदा काही भूमाफिया व स्थानिक ग्रामस्थांनी उचलायला सुरुवात केल्याचे दिसते. प्रत्येक गावातील दोन-तीन तलाव वा बोडय़ांपकी एकतरी नामशेष झाल्याचे दिसते.
परिणामी, तलावाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्य़ातील सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाई, तर शेतीला सिंचनाच्या    समस्येला     सामोरे जावे लागत आहे. ही    स्थिती प्रत्येक तालुक्यातही प्रामुख्याने पहावयास मिळते. वाढती लोकसंख्या हे त्यामागचे एक कारण असले तरी    जमिनीच्या    व्यावसायिकरणातूनच  या शहरातील तलावांचे    अस्तित्व    नष्ट होत    आहे, मात्र    तालुका व नगर    प्रशासनाकडून    त्याकडे झोळेझाक होत असल्याने भूमाफियांचे चांगलेच फावत आहे.