चंद्रपुरातील २ बडय़ा भंगार विक्रेत्यांवर छापे, ४ अटकेत Print

चंद्रपूर / प्रतिनिधी
भंगार विक्रेत्यांकडे मोठय़ा प्रमाणात चोरीचे लोखंड येत असल्याच्या गोपनीय माहितीवरून शहरातील दोन बडय़ा भंगार विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानावर छापे टाकून पोलिसांनी तीन ट्रकसह आठ लाखाचे भंगार जप्त केले आहे. यात रहीम करीमलाला काझी, अनिस युनूस खान पठाण, नजीर अहमद अब्दुल मजीद व मनीष गेडाम यांना अटक करण्यात आलेली आहे.
 शहरात आणि शहराबाहेर मोठय़ा प्रमाणात लोखंडाची चोरी होत असून चोरीचे लोखंड चंद्रपुरातील काही बडय़ा भंगार व्यावसायिकांना विकले जात असल्याची गोपनीय माहिती घुग्घुस आणि रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.राजू भुजबळ, घुग्घुसचे ठाणेदार अजित लकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पाल, झुरमुरे, जाधव, जितू आखरे, प्रभू कलसीवाले, बाबा गर्जे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या भंगार व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांची झडती घेतल्यानंतर हजारो क्विंटल संशयास्पद भंगार आणि तीन ट्रक  पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणात आणखी काही बडय़ा भंगार व्यावसायिकांचा हात असल्याने त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रहीम काझी व अनिल पठाण यांना अटक केल्याची बातमी भंगार व्यावसायिकांमध्ये पसरताच भंगार व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गर्दी केली. या प्रकरणात पोलीस कोठडी मिळण्यासाठी आरोपींना न्यायालयात हजर करणयत आले, मात्र पोलीस कोठडी मिळाली नाही, असे ठाणेदार लकडे यांनी सांगितले.