पिरकल्याण धरणात अत्यल्प जलसाठा Print

खडकपूर्णातून पाणीपुरवठा करण्याची मागणी
बुलढाणा/प्रतिनिधी
राष्ट्रमाता मॉं जिजाऊं च्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिरकल्याण धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने महिनाभरात शहरवासियांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणर आहे. त्यामुळे पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष सीताराम चौधरी, रा.कॉं. जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांनी या धरणाची पाहणी करून शहराकरिता खडकपूर्णा धरणातून तात्काळ पूरक योजना सुरू करावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
सिंदखेडराजा शहराची लोकसंख्या २५ हजार असून नागरिकांना दररोज पिण्याकरिता १० लाख लीटर पाणी लागते. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती तालुक्यात बघायला मिळत आहे.
शहरापासून २० किलोमीटर अंतरावर मराठवाडय़ाला लागून असलेल्या पिरकल्याण धरणावरून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.
साधारणपणे १ दशलक्ष घनमीटरपेक्षा कमी बाष्पीभवनामुळे मोठय़ा प्रमाणात जलसाठा कमी होत असून अनेक ठिकाणी मोटारीने शेतकरी शेतीसाठी चोरून पाणी घेत असल्याने मोठया मुश्किलीने महिनाभरच पाणी मिळू शकते. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी व एअर व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होते. त्यामुळे हा जलसाठा लवकरच संपुष्टात येणार आहे.
सध्या शहराला दहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्यासाठी नळावर मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. तेच पाणी दहा दिवस राखून ठेवत प्यावे लागते. त्यामुळे जलजन्य आजाराची लागण होण्याची शक्यताही मोठय़ा प्रमाणात बळावली आहे. गत दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी वाघ यांनी टंचाईचा आढावा घेण्यासाठी शहरात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी नगराध्यक्ष सीताराम चौधरी यांच्यासह पत्रकारांनीही खडकपूर्णा धरणावरून जळयोजना सुरू करावी, अशी मागणी केली होती, मात्र थोडासा पाऊस पडल्याने या मागणीचा पाठपुरावा प्रशासकीय स्तरावरून झाला नसल्याने ही प्रक्रिया खोळंबली. पाणीटंचाई लक्षात घेता नगराध्यक्ष सीताराम चौधरी, रा.कॉं. चे जिल्हा कार्याध्यक्ष व न.प. गटनेते अ‍ॅड. नाझेर काझी, पाणीपुरवठा सभापती प्रकाश मेहेर, पाणीपुरवठा विभागाचे इंगळे यांनी धरणावर जाऊन पाहणी केली. पाणीटंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता खडकपूर्णा धरणावरून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली.