अकोल्यात पोलिओसदृश्य रुग्णाने खळबळ Print

आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग; बालकांच्या तपासणीस सुरुवात
अकोला / प्रतिनिधी - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
विझोरा येथील विनल सुनील उपरास या अकरा वर्षीय बालिकेला पोलिओ सदृश्य लक्षणे आढळल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. अद्याप या रुग्णास पोलिओ झाला आहे, असे म्हणता येणार नाही, असे मत पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे प्रमुख डॉ.ठोसर यांनी स्पष्ट केले.  पोलिओ आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी या मुलीचे आवश्यक ते नमुने मुंबईतील हाफकिन संस्थेत पाठविण्यात येत आहेत. एक महिन्यानंतर अहवाल आल्यावर या बालिकेस पोलिओ आहे की नाही, या बाबतची खात्री होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विझोरा येथील शेतमजुरी करणाऱ्या सुनील उपरास यांची मुलगी विनल हिला या महिन्याच्या सुरुवातीला चालणे, उभे राहणे, झोपेतून उठणे व दोन्ही पायात त्राण नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर या परिवाराने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू केले. उपचार सुरू असताना तिला पोलिओ सदृश्य आजार झाल्याची माहिती मिळाली, पण रुग्णास ट्रान्स्फर मायलायटीस असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  
दरम्यान, विनल ही पोलिओ सदृश्य असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाल्यानंतर त्यांनी विझोरा गावातील सर्व बालकांना पोलिओ निर्मुलनासाठी आवश्यक डोस पाजण्यास सुरुवात केली आहे, तसेच नजीकच्या गावातील पाच वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. त्याचबरोबर नजीकच्या गावातील बालकांना डोस पाजण्याची तयारी आरोग्य यंत्रणेने सुरू केली.
कान्हेरी सरप आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या या गावातील सर्व बालकांची तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, विनल या बालिकेला पोलिओ झाला की नाही, याची चाचपणी करण्यात येईल व त्यानंतर तिला पोलिओ आहे की नाही, याची खातरजमा होईल.
जागतिक आरोग्य संघटना, राज्य सरकार व केंद्र सरकार पोलिओ निर्मुलनासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च करते, पण अशा प्रकारे संशयित रुग्ण आढळल्याने पोलिओ निर्मुलन कार्यक्रमातील त्रुटींचा उलगडा होतो.