ओबीसी कर्मचारी असोसिएशनचा इशारा Print

पात्र उमेदवारास न्याय न दिल्यास मुक्तविद्यापीठासमोर आंदोलन
चंद्रपूर/ प्रतिनिधी
विदर्भातील प्राथमिक शिक्षकांना असभ्य वागणूक दिल्याने ओबीसी कर्मचारी असोसिएशनतर्फे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. या घटनेचा निषेध करून पात्र उमेदवारास तात्काळ न्याय देण्यात यावा, अन्यथा संघटनेच्या वतीने विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नरेंद्र इटनकर यांनी दिला आहे.  नाशिक येथे गेल्या २५ व २७ ऑक्टोबरला एम.एड. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते.
२५ ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत खिरोदा या केंद्रातील खुल्या प्रवर्गाच्या प्रवेशाबाबत हेतूपुरस्सर अनियमितता करण्यात आली. खुल्या प्रवर्गाकरिता ५० टक्के जागा राखीव असून यानुसार प्राथमिक शिक्षक व इतर या गटात ५ जागा भरणे अपेक्षित होते. निवड यादीतील क्रमानुसार प्रथम पाच उमेदवार प्रवेशाकरिता पात्र होते. त्यापैकी २ उमेदवार हजर नव्हते. त्यामुळे नियमानुसार प्रतीक्षा यादीतील पहिल्या दोन उमेदवारांना प्रवेश देणे गरजेचे होते, परंतु तसे न करता इतर मागासवर्गीय संवर्गातील आजी, माजी सैनिकांच्या पाल्याला सामाजिक आरक्षणांतर्गत खुल्या प्रवर्गातून  प्रवेश देण्याचा हेका विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी धरला.
प्रवेश प्रक्रियेच्या ध्येय धोरणानुसार सामाजिक आरक्षणात प्रतीक्षा  यादीतील उमेदवारांची निवड झाल्यास ती त्या त्या प्रवर्गात दाखविण्यात येईल, असे नमूद आहे, तर शिक्षक-प्रशिक्षक गटातील आठजागांपैकी चार जागा भरण्यात आल्या. उर्वरित चार जागांकरिता उमेदवार नसल्याने रिक्त होत्या. तेव्हा या जागांबाबत संचालकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गट आणि प्राथमिक शिक्षक व इतर गट यात प्रत्येकी दोन जागा भरण्याचे निर्देश दिले. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी मनमानी करून त्या चारही जागा माध्यमिक व उच्च माध्यमिक या एकाच गटात भरल्या. या अनियमिततेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा करावयास
गेलेल्या प्राथमिक शिक्षकांना तेथील संगणक चालकाने धक्काबुक्की करून चालते व्हा, अशा धमकीवजा शब्दात अपमानास्पद वागणूक दिली. या सर्व घटनेची तक्रार नाशिक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू यांनाही निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.  या घटनेचा निषेध करून पात्र उमेदवारास तात्काळ न्याय द्यावा, अन्यथा
संघटना विद्यापीठासमोर आंदोलन करेल असा इशारा नरेंद्र इटनकर यांनी दिला आहे.