दिवाळीनिमित्तच्या सुगंधित आणि संगीतमय शुभेच्छापत्रांनी साधली सर्वभाषिकांची सोय Print

चंद्रपुरातील बाजारपेठा सजल्या
चंद्रपूर / प्रतिनिधी
दिवाळीला अवघे काही दिवसच शिल्लक असतांना शहरातही विविध दुकानांमध्ये, बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. रांगोळीसाठी आवाज देणारे हातठेलेवाले, फुटपाथवरील पणती विक्रेते, रात्री दुकानांमध्ये लखलखणारे आकाशदिवे दीपावलीची जाणीव करून देत आहेत. अशावेळी अचानकपणे शुभेच्छापत्राद्वारे येणारा छानसा संदेश हा उत्साह आणखी द्विगुणित करतो.
मोबाईलच्या या युगात पत्रांद्वारे कळविली जाणारी ख्यालीखुशाली केव्हाच लोप पावली असतांना दिवाळीत एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठविले जातात. सुगंध आणि संगीत असलेली शुभेच्छापत्रेही आता येऊ लागली आहेत. प्रामुख्याने दिवे, आकाशदीप, रांगोळी, लक्ष्मीचे चित्र असलेल्या शुभेच्छापत्रांना अधिक मागणी असते. दोन रुपयांपासून तर शंभर-दिडशे रुपयापर्यंत मिळणारी ही शुभेच्छापत्रे खरेदी करतांना ग्राहक किंमत नाही, तर त्यातील संदेश पाहूनच ही शुभेच्छापत्रे खरेदी करतात. शिवाय, आता इंग्रजीतच नव्हे, तर मराठी, हिंदी तसेच इतर विविध भाषांमध्येही ही शुभेच्छापत्रे येऊ लागल्याने सर्वभाषिकांसाठी ते सोयीचे ठरत आहे. याव्यतिरिक्त काही हौशी मंडळी विविध वस्तूंचा वापर करून शुभेच्छापत्रे तयार करतांना आढळून येतात. ही शुभेच्छापत्रेही वेगळाच आनंद देऊन जातात.
याच दिवसात शुभेच्छापत्रांसोबत पाठविल्या जाणाऱ्या फराळाची जागा आता मिठाई आणि भेटवस्तूंनी घेतली आहे. एकमेकांना घरी बोलावून खास पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत केव्हाच बंद झाली आहे. श्रीमंत वर्गात प्रामुख्याने काजू, किसमीस, बदाम, अक्रोड अशी ड्रायफ्रूट्सची विविध आकारातील आणि आकर्षक पॅकींगमधील डबे एकमेकांना पाठविण्याची पद्धत आता अधिक रूढ झाली आहे, तर खवा, खोबऱ्यापासून वेगवेगळय़ा प्रकारच्या मिठाई बाजारात उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांसाठी त्या अधिक सोयीच्या ठरू लागल्या आहेत. याशिवाय, डेकोरेटिव्ह कॅंडल्स, दिवे आणि क्रॉकरीज भेट म्हणून पाठवण्याचीही पद्धत रूढ होत आहे.
शहरातील गोलबाजारात आकाशदिव्यांची बरीच दुकाने लागली आहेत. रात्रीच्या वेळी लखलखणारे हे आकाशदिवे सहजच ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दहा रुपयांपासून तर पाचशे रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या आकाशदिव्यांचे साठ ते सत्तर प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. विशेषत: कपडय़ांपासून बनलेले आकाशदीप सर्वाधिक महाग आहेत. यांची नावे सुद्धा मजेशीर आहेत. हंडी, डबलहंडी, अनार पे अनार, करंजी या नावाने हे आकाशदीप बाजारात विकले जात आहेत. एकटय़ा चांदणीच्या आकारातील ४०-४५ प्रकार आढळून येतात. याशिवाय, शंखांच्या आकारात सुद्धा आकाशदिवे उपलब्ध आहेत. थर्माकोलपासून बनणाऱ्या आकाशदिव्यांची जागा आता प्लास्टिक आणि कापडांच्या आकाशदिव्यांनी घेतली आहे. हे आकाशदीप प्रामुख्याने मुंबईहून  मागवले जातात, असे एका विक्रेत्याने सांगितले.
गेल्या अनेक वर्षांंपासून नागपूर मूल मार्गावर राजस्थानमधील पणती विक्रेते दुकाने थाटत आहेत. जोधपूर जिल्ह्य़ातील पिपरसिटीतील लोणी नदीतील मातीपासून तयार होणाऱ्या या पणत्या गेल्या काही वर्षांपासून अधिक पसंतीस उतरल्या आहेत. आकाशदीप, चक्रदीप, कलशदीप, फूलदीप, स्टारदीप, गणेशदीप, नारळदीप अशी विविध नावे आणि याच नावानुसार आकार असलेल्या या पणत्यांकडे ग्राहकांचा अधिक कल आहे. चाळीस ते दीडशे रुपयापर्यंत या पणत्यांची किंमत आहे. भारतीय बाजारावर चीनने आक्रमण केले असतांनाच या पणत्या सुद्धा त्यातून सुटलेल्या नाहीत. चिनीमातींच्या पणत्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. असे असले तरीही ग्राहक मात्र या पारंपरिक पणत्यांकडेच अधिक वळतांना दिसतात. पाच ते दहा रुपये डझनप्रमाणे मिळणाऱ्या या पणत्या गरिबांची घरे उजळून देण्यास सज्ज झाल्या आहेत.
याशिवाय, मेणाच्या विविध रंगांमधील पणत्याही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत, कार्यालये व दुकानांमध्ये याच पणत्यांचा वापर होत असल्याने ते खरेदी करीत आहेत.