तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रद्द Print

ग्रामीण आरोग्यसेवा अडचणीची
प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
जिल्हा परिषदेकडील राज्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची (टीएचओ) पदे राज्य सरकारने रद्द केली आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे चिकित्सेसाठी नियुक्त केले जाणार आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोठय़ा प्रमाणात तुडवडा जाणवत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य खात्याच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता तालुका पातळीवर सार्वजनिक आरोग्य सेवेवर थेट नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी नसेल. प्रत्येकवेळी जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना आपतकालीन गोष्टींसाठीही गावपातळीवर धाव घ्यावी लागेल. पाच-सहा वर्षांपूर्वीच ही पदे निर्माण करण्यात आली होती. तालुका अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे चिकित्सेसाठी नियुक्त करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत विकल्प देण्याची सूचना केली आहे. जिल्ह्य़ातील १४ पैकी १३ ठिकाणी टीएचओ आहेत. त्यामुळे आता नगर जिल्ह्य़ात आणखी १३ वैद्यकीय अधिकारी मिळतील.
सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसह जिल्हा सरकारी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा आहे. ग्रामीण भागात काम करण्याची सक्ती व अनुभव यासाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर जिल्हा परिषदेच्या सेवेत येतात, मात्र दोन वर्षांतच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नावाखाली दिर्घकालीन रजेवर जातात किंवा राजीनामा देतात. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त असतात, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी एकही अधिकारी नसतो, त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर त्याचा विपरित परिणाम झालेला आहे. नगर जिल्हा परिषदेकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची २१५ पदे मंजूर आहेत, प्रत्यक्षात ३७ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. हा आकडा दरमहा कमी-जास्त होत असतो. तालुकांतर्गत सार्वजनिक आरोग्य सेवेवर नियंत्रण राहवे, त्यामध्ये सुसूत्रता यावी, साथीच्या रोगाच्या उद्भवाच्या प्रसंगी तातडीने दखल घेता यावी सरकारी योजनांची प्रभावी अंलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक तालुका ठिकाणी एक तालुका वैद्यकीय अधिकारी पद निर्माण करण्यात आले. त्यांना कार्यालय, वाहन, ५-६ सहायक कर्मचारी देण्यात आले. केवळ पर्यवेक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. रुग्ण चिकित्सेचे काम त्यांच्याकडे नव्हते.
आपतकालीन परिस्थितीत थेट नियंत्रण ठेवण्यासाठी हे पद उपयुक्त ठरत होते. आता त्यासाठी जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यास धाव घ्यावी लागणार आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा आरोग्याधिकारी व तीन अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची पदे आहेत. मात्र, नगरमधील अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकाऱ्याचे एक तर राज्यातील अनेक पदे रिक्तच आहेत. आता टीएचओ पद रद्द करण्यात आल्याने तेथील कर्मचारी वाहनेही प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वर्ग केले
जातील.