कोपरगावच्या खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार Print

कोपरगाव/वार्ताहर
येथील जागृत देवस्थान व ग्रामदैवत खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून त्यासाठी २० ते २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे असे व्यवस्थापक नारायण देवरे यांनी सांगितले. खंडोबा देवस्थानचे आठव्या पिढीचे वारसदार व्यवस्थापक देवरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ऐतिहासिक नोंदीवरून कोपरगावची स्थापना १७९० साली झाली. सन १८५७ मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध राष्ट्रीय लढा साऱ्या देशभर भडकला त्यात अनेक क्रांतिकारकांनी योगदान दिले. काहींनी स्वत: भाग न घेता क्रांतिकारकांना जवान पुरवणे, पैसा पुरवणे, त्यांच्याकडील सांकेतिक संदेशाची देवाण-घेवाण करून स्वातंत्र्यलढय़ाची धार अधिक तीव्र करण्याचे काम विविध ठिकाणच्या देवालयातून केले.
कै. विठोबा देवरे यांनी त्यावेळेच्या खांदेशामधील खंडोबाची दुसरी पत्नी वानाई देवीच्या चेवलपुर या जागृत स्थानातून झालेल्या दृष्टांतातून कोपरगावी येवून या खंडोबाची स्थापन केली. सन १८५५ मध्ये इंग्रज सरकारने ४५ एकर जमीन या देवस्थानाला दिली होती. ही जमीन खंडोबाची मुक्त माळ या नावाने परिचित होती. १९४० साली शासनाने ही जमीन ताब्यात घेवून महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व औद्योगिक प्रदर्शनास दिली. त्याबदल्यात मौजे मुर्शतपुर शिवारात १० एकर जागा खंडोबा देवस्थानला इनाम देण्यात आली. तेथे आजही पिके घेवून मंदिराच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च त्यातून भागविला जातो.
खंडोबाच्या मंदिरात दोनशे वर्षांपेक्षाही जास्त परंपरा असून प्रत्येक वर्षी विजयादशमी दसरा व चंपाष्ठीचे अगोदर पाच दिवस आधी खंडोबाच्या घाटाची स्थापना केली जाते. मंदिरासमोर जुन्या काळातील दगडी कोरीव आठ गुणिले तीन फुट खोलीच्या खड्डय़ात धगधगत्या विस्तवावरून वाघ्या-मुरळी चालतात. शहरातील धनगर समाजाची मानाची कर्णमहाल काठी खंडोबाच्या भेटीस आणण्याची प्रथा आहे. चंपाष्ठीच्या रात्री बाहेरगावहून आलेले वाघ्या-मुरळी इतर कलाकार देवासमोर हजेरी लावतात, कला सादर करतात सांप्रदायिक भजनी मंडळी भजने म्हणतात.    
साईबाबांची भेट
ऐतिहासिक परंपरा असलेल्या या खंडोबाच्या मंदिरात साकुरीच्या उपासनी महाराजांनी सन १९११ साली अनुष्ठान केले होते. याच काळात साईबाबांनी या मंदिरास भेट देवून खंडोबाचे दर्शन घेतले होते. या स्थानास हे आगळे महत्वही आहे.