नोव्हेंबरमध्ये नगरला राष्ट्रीय कृषी प्रदर्शन Print

प्रतिनिधी
देशभरातील नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेले राष्ट्रीय कृषी प्रदर्शन नगरमधील स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावर दि. २३, २४ व २५ नोव्हेंबरला ड्रीम वर्क्‍स इव्हेंट कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल.
कंपनीचे संचालक विक्रांत धुमाळ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रदर्शनात बी-बियाणे, खते, यंत्रसामुग्री, डेअरी, हरितगृहे, पॉलिहाऊस, पाईप्स, ठिबक सिंचन, किटकनाशके उत्पादक कंपन्या, तसेच महिला बचतगट, प्रकाशन संस्था, आयुर्वेद कंपन्या, शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या, रेशीम उद्योग, कुक्कुटपालन आदी १०० हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यात काही परदेशी कंपन्याही आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची माहिती देण्यासाठी विविध विषयांतील तज्ज्ञांची व्याख्याने व परिसंवादही प्रदर्शनस्थळी होणार आहेत. प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ७ दरम्यान खुले राहील. प्रदर्शनास राज्यातील शेतकरी भेट देतील, असे नियोजन करण्यात आल्याचे कंपनीचे अजिंक्य गायकवाड यांनी सांगितले. प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी मो. ८९७५७६४०९९ येथे संपर्क करण्याचे आवाहन आहे.