‘औद्योगिक ग्राहकांना सवलत हवी’ Print

उद्योगांच्या वीज दरवाढीचा निषेध
 प्रतिनिधी
महावितरणने उद्योगांना लागू केलेल्या वाढीव दराचा महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअर्स असोसिएशनने निषेध केला आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही औद्योगिक ग्राहकांना सवलतीत वीज मिळावी, अशी मागणी या संघटनेचे हरजित वधवा यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
औद्योगिक ग्राहकांच्या दरात महावितरणने वाढ केल्याबद्दल राज्यातील उद्योजकांनी आज बंध पाळला होता, नगरमधील उद्योजकांच्या संघटनांनी मात्र त्यास प्रतिसाद दिला नाही. काही संघटनांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय आम्हाला उशिरा कळाला. महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअर्स असोसिएशनने या बंदला पाठिंबा देताना दरवाढीचा निषेध केला आहे.
औद्योगिक मंदिमुळे व विविध करांच्या ओझ्यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्रात मंदिचे वातावरण आहे. त्यात महावितरणने दरवाढ केल्याने उद्योजकांचे अधिकच हाल सुरु झाले आहेत. दरवाढीमुळे ते इतर राज्यांतील उद्योजकांच्या स्पर्धेतून बाहेर पडतील, देशात सर्वात महाग वीजदर महाराष्ट्रात आहे, रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान औद्योगिक वीज वापरासाठी प्रती युनिट २ रुपये ५० पैसे असा सवलतीचा दर देण्यात यावा, अशी मागणी वधवा यांनी निवेदनात केली आहे.