मनपा विभागप्रमुखांना आयुक्तांची तंबी Print

प्रतिनिधी
सत्ताधारी, विरोधक, नागरिक अशा सर्व स्तरांतून महापालिकेच्या कामकाजाबाबत ओरड होऊ लागल्याने आयुक्त विजय कुलकर्णी यांनी आज मनपाच्या विभागप्रमुखांची बैठक घेतली व त्यांना कामात सुधारणा करण्याची तंबी दिली. कामचुकार कर्मचाऱ्यांची गय न करता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
मनपाच्या कारभाराबाबत, विशेषत: आरोग्य विभागाच्या कामावरून सध्या बरीच टिका सुरू आहे. साथीच्या आजारांच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसते आहे, तसेच मनपाचे दवाखानेच आजारी पडले आहेत. त्यामुळे महापौरांसह सर्व पदाधिकारी व विरोधी, तसेच सत्तेतीलही नगरसेवक संतप्त आहेत. अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नसल्यानेच असे होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आयुक्त कुलकर्णी यांनी पदाधिकारी व नगरसेवकांच्या या रोषाची दखल घेत आज सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, उपआरोग्य अधिकारी एन. एस. पैठणकर, शहर अभियंता नंदकुमार मगर, अतिक्रमणचे सुरेश इथापे, तसेच कर वसुली, आस्थापना, विद्युत या विभागांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, प्रभारी उपायुक्त संजीव परशरामी हेही बैठकीत होते.
मनपाच्या कामकाजावर होत असलेल्या टिकेबाबत बोलून आयुक्तांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या टिकेला अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनच संधी दिली जात आहे. काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, कोणालाही पाठीशी घालू नका असे त्यांनी सर्वाना बजावले. आरोग्य विभागाचा त्यातही पुन्हा कचरा संकलन व वाहतूक याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाचा आढावा घेत त्यांनी विभागप्रमुखांना सूचना केल्या. कामात सुधारणा दिसली पाहिजे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी बजावले.    

आंदोलकांसमवेतही बैठक
माजी महापौर संग्राम जगताप, तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अलीकडेच केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आयुक्त कुलकर्णी यांनी आज त्यांच्यासमवेतही बैठक घेतली. रस्ते, गटारी, नाली, कचरा संकलन व वाहतूक, भटके कुत्रे पकडण्याचे काम याबाबतच्या जगताप व अन्य नगरसेवकांच्या तक्रारींचे त्यांनी लगेचच निराकरण केले. कचरा वाहतुकीची, तसेच कुत्री पकडण्याच्या कामाची निविदा निघाली असून त्याला मंजुरी दिली गेली की काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.