कोतकर बंधूंच्या अर्जावर दि. १ ला सुनावणी शक्य Print

प्रतिनिधी
अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी माजी महापौर संदीप कोतकर, तसेच त्याचे दोन भाऊ सचिन व अमोल कोतकर यांनी जिल्हाबंदी शिथील व्हावी यासाठी दाखल केलेल्या अर्जावर १ नोव्हेंबरला निर्णय होण्याची शक्यता आहे.
तिघाही कोतकर बंधूंना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, मात्र कनिष्ठ न्यायालयाने घातलेल्या जिल्हाबंदीचा आदेश १३ मे पासून कायम आहे. या प्रकरणातील एक आरोपी, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना उच्च न्यायालयाने जिल्हाबंदीच्या आदेशातून नुकताच दिलासा दिला, त्यानंतर तिघा कोतकर बंधूंनी जिल्हाबंदीची अट शिथील करावी यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर जिल्हा सत्र न्यायाधिशांकडे सुनावणी झाली. आरोपींच्या वतीने वकील सतीश उदास, सतीशचंद्र सुद्रिक व महेश तवले यांनी, तर सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी म्हणणे सादर केले. मूळ फिर्यादी शंकर राऊत यांनीही अटी शिथिल करण्यास विरोध असल्याचे म्हणणे मांडले. आता त्यावर १ नोव्हेंबरला निकाल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी भानुदास कोतकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.