सोनाली बऱ्हाटे यांना कॉमनवेल्थ फेलोशिप Print

ब्रिटनमध्ये वर्षभर संशोधन
 प्रतिनिधी
जिल्ह्य़ाच्या सुकन्येने शिक्षणाच्या जोरावर थेट ग्रेट ब्रिटनमध्ये भरारी मारली. जगाच्या शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ फेलोशिप-२०१२ साठी सोनाली गणेश बऱ्हाटे यांची निवड झाली. वर्षभर त्या तिथे संशोधन करणार आहेत.
सोनाली या घोडेगाव (ता. नेवासे ) येथील रहिवासी आहेत. तेथील भाऊसाहेब रोहमारे यांच्या त्या कन्या आहेत. प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी मुंबईतून बी. फार्मसी व नंतर एम. टेक. पर्यंतचे शिक्षण केले. सध्या त्या पुणे विद्यापीठात पीएचडी करत होत्या. त्यासाठी पुण्यातीलच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत त्यांचे संशोधन सुरू होते.हे संशोधन करत असतानाच त्यांनी कॉमनवेल्थ फेलोशीपसाठी निवड चाचणी दिली. जगातील १५० देशांतील अनेक प्रज्ञावंत विद्यार्थी ही चाचणी देत असतात. यासाठीचे नामांकन त्यात्या विद्यार्थ्यांच्या देशातर्फे ब्रिटीश कौन्सीलकडे केले जाते. तिथे त्यांच्या विषयतज्ञांकडून पुन्हा चाचणी, मुलाखत होऊन नंतर फेलोशिप जाहीर केली जाते. सोनाली यांनी या सर्व चाचण्या पार पाडल्या. आता त्या इंग्लंडमधील सन १८८३ ची स्थापना असलेल्या कार्डिफ विद्यापीठात नोबेल पुरस्कार विजेत्या चमुबरोबर संशोधन करतील. त्यांचा विषय सभोवातलच्या परिस्थितीनुरूप स्वत:मध्ये बदल घडवणाऱ्या संप्रेरके व विघटकांचा सखोल अभ्यास हा आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रावसाहेब बऱ्हाटे, भाऊसाहेब बऱ्हाटे, आसाराम बऱ्हाटे, गणेश बऱ्हाटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.