कामगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा Print

मनपात बोनसबाबत चर्चा सुरू
 प्रतिनिधी
दिवाळीसाठी बोनस देण्याच्या विषयावर महापालिका आयुक्त व कर्मचारी युनियन यांच्यात आज चर्चा झाली. बोनससंबंधी काही निर्णय झाला नाही तर २९ ऑक्टोबरपासून मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा युनियनने दिला.
मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. महिन्याचा अत्यावश्यक खर्च ५ ते ६ कोटी रूपयांच्या पुढे व उत्पन्न मात्र अवघे चार-साडेचार कोटी रूपये अशी स्थिती आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले अदा करणे तर राहिलेच आहे, पण कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देणेही प्रशासनाला अवघड झाले आहे. जकात होती त्यावेळी त्या उत्पन्नावर सगळे व्यवस्थित सुरू होते, मात्र आता जकात बंद झाली व तेवढे उत्पन त्याऐवजी सुरू केलेल्या स्थानिक संस्था करातून (एलबीटी) मिळत नाही. ही सर्व स्थिती प्रशासनाने युनियनच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडली.
युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी त्यावर वर्षांच्या सुरूवातीपासूनच कर्मचाऱ्यांच्या बोनससाठीची आर्थिक तरतूद करावी ही मागणी युनियन कधीपासून करते आहे असे निदर्शनास आणले. हा आर्थिक नियोजनाचा भाग आहे व त्याच्याशी कर्मचाऱ्यांचा संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे बैठकीत काही ठोस निर्णय होऊ शकला नाही. पुन्हा बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. बोनसचा निर्णय झाला नाही तर २९ पासूनचे धरणे आंदोलन सुरू होईल, असे लोखंडे यांनी सांगितले.