श्रीगोंदे तालुक्यात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी Print

जिल्हा रूग्णालयात महिलेची हेळसांड
 कर्जत/वार्ताहर
स्वाईन फ्लूच्या साथीने श्रीगोंदे तालुक्यात आणखी एका रूग्णाचा बळी घेतला. विसापूर येथील महिलेचे या आजाराने काल (बुधवार) निधन झाले. या आजाराचा हा महिन्यातील दुसरा बळी असून आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी यामुळे मोठय़ा प्रमाणात नाराजी पसरली आहे. पालकमंत्र्यांच्याच तालुक्यात हा सलग दुसरा बळी गेला आहे.
सोनाली सुशांत शिंदे (वय ३२, रा. विसापूर ) असे मृत महिलेचे नाव आहे. सोनाली हीस काल जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांनी दोन तास रूग्णाकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे रूग्णाला पुणे येथे हलविण्यात आले, मात्र रस्त्यातच सोनालीचा मृत्यू झाला.
विसापूर येथील सोनाली शिंदे यांना ताप व सर्दीमुळे दि. १८ ला खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. तेथे बरे न वाटल्याने दि. २३ रोजी त्यांनी बेलवंडी येथे दोन दिवस खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. नंतर तेथून त्यांना शिरूर येथे नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी सोनालीस तत्काळ पुण्याला नेण्याचा सल्ला दिला. परंतु नातेवाईकांनी तिला नगर येथील आनंद हॉस्पीटल येथे आणले, मात्र तेथेही जिल्हा रूग्णालयात नेण्याचा सल्ला मिळाला. जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर दोन तास थांबूनही त्यांची तिथे कोणीही दखल घेतली नाही, तपासणी करण्यास डॉक्टर आले नाहीत व रूग्णाची प्रकृती जास्तच बिघडू लागली. त्यामुळे नातेवाईकांनी सोनालीस पुणे येथे हलविण्याचे ठरवले. परंतु पुण्याला नेताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील पोटे व तालुका आरोग्य अधिकारी शैला डांगे यांनी पाहणी करून गावात आरोग्यपथक नेमले. मयत सोनालीचा पती, तसेच मुलांना तपासणीसाठी नगरला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी खरातवाडी येथील नामदेव खरात यांचाही स्वाईन प्लूने मृत्यू झाला होता. त्यानंतरही तालुक्यात आरोग्य विभागाने पुन्हा असे घडू नये म्हणून काहीच केले नाही. तालुक्यातील कोळगाव या आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी श्री. दासरे यांच्या कामकाजाविषयी नागरिकांत मोठी नाराजी आहे. वारंवार तक्रारी येऊनही जिल्हा आरोग्य अधिकारी या अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात. श्रीगोंदे येथील आरोग्य अधिकाऱ्याचा शहरातच खाजगी दवाखाना आहे. त्यामुळे सरकारी कामात त्यांचे दुर्लक्ष होते.