वाद मिटविण्याच्या ग्रामसभेतच दंगल; ६ जखमी Print

सावळीविहीर येथे २४ जणांना अटक
 राहाता/वार्ताहर
दांडिया खेळण्याच्या कारणावरून तालुक्यातील सावळीविहीर येथे आज सकाळी दोन गटातील वाद मिटविण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत दंगल उसळल्याने सहाजण जखमी झाले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. गाव व आठवडेबाजारही आज बंद होता. पोलिसांनी दोन्ही गटांच्या ५३ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
विजयादशमीनिमित्त सावळीविहीर येथे दांडिया चालू असताना तेथे नाचण्यावरून तरूणांच्या दोन गटांत वाद झाले. या वादाची पाश्र्वभुमी लक्षात घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते बुधवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आले. तेथे चर्चा होऊन वाद मिटल्याची कबुली दोन्ही गटांनी पोलिसांना दिली. आज सकाळी एका गटाने निषेध करण्यासाठी गावबंद करण्याचे आवाहन केले. नंतर वाद मिटविण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभा सुरू होताच दोन गटांत बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान दंगलीत झाले. दोन्ही गटांतून गज, काठय़ा, तलवारी यांचा वापर करण्यात येऊन दगडफेक करण्यात आली. यात सहाजण जखमी झाले.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविले. दंगलीमुळे गाव बंद ठेवून भीतीने आठवडेबाजारही रद्द झाला. एवढी मोठी घटना घडूनही कुणीही पोलिसांत फिर्याद दिली नाही. सायंकाळी सहायक पोलीस निरीक्षक यशवंत बत्तीशे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यावरून शिर्डी पोलिसांनी दोन्ही गटांच्या ५३ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून २४ जणांना अटक केली. इतर आरोपी फरार झाले.
सावळीविहीर येथे सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हा प्रकार टळला असता असे नागरिकांचे म्हणणे आहे.