शहरातील अस्वच्छतेवर महापौरांची नापसंती Print

कामचुकारांवर कारवाईचा इशारा
 प्रतिनिधी
महापालिकेच्या आरोग्य विभागावर सर्वानी कोरडे ओढून झाल्यावर आता खुद्द महापौर शीला शिंदे यांनीच या विभागाला धारेवर धरले आहे. विभागाच्या कामगीरीत सुधारणा झाली नाही तर शहरात अचानक फेरफटका मारून अस्वच्छचा दिसेल त्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी आज दिला.
आयुक्त विजय कुलकर्णी यांना महापौरांनी याबाबतचे लेखी पत्रच दिले. आरोग्य विभागात कामगार, मुकादम, केअरटेकर, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक, त्यांच्यावर नियंत्रण करणारे अधिकारी, उपआरोग्यअधिकारी, उपायुक्त अशी रचना आहे. इतके मोठे मनुष्यबळ असूनही शहरात सगळीकडे अस्वच्छता का आहे असा सवाल महापौरांना पडला आहे.
त्याचे उत्तरही त्यांनीच या विभागात समन्वयाचा अभाव दिसतो आहे असे दिले आहे. कचरा नियमीतपणे उचलला जात नाही, त्याची वाहतूक नीट होत नाही, रस्त्यांची स्वच्छता व्यवस्थित होत नाही, साईडपट्टय़ांवरचा कचरा आहे तसाच असतो, नाली, ड्रेनेजमधून गाळ काढला जात नाही, काढलेला गाळ उचलून नेला जात नाही असे शहराचे नेमके निरीक्षणच महापौर श्रीमती शिंदे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नोंदवले आहे.
यापूर्वी शहरातील रस्ते एकदा सकाळी व एकदा दुपारी असे दोन वेळा झाडले जात होते. आता दुपारचे सत्र बंदच केले गेले आहे. काही महिन्यांपूर्वी कामगारांचे गट तयार करून त्यांना प्रभागवार नियुक्तया दिल्या होत्या व तेथील रस्त्यांच्या कडेचे, मोकळ्या जागांवरचे गवत काढून घेतले जात होते. तेही आता पूर्णपणे बंद झाले आहे. कोणाला विचारून ही कामे बंद केली गेली, असा प्रश्न महापौरांनी आयुक्तांना विचारला आहे.
आरोग्य विभागाची बैठक घ्यावी व त्यांना कामे नीट करण्याबाबत सक्त आदेश द्यावेत. येत्या काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर शहरात फेरफटका मारून संयुक्त भेटी करू. त्यात ज्या ज्या ठिकाणी कचरा उचलला गेला नाही, रस्ते स्वच्छ केले गेले नाहीत असे आढळेल त्या भागातील सफाई कामगारांपासून सर्वाना जबाबदार धरत त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा महापौरांनी दिला आहे.