समन्वय नसल्याने जिल्ह्य़ात साथीचे आजार Print

जि. प. मध्ये विसंवादाचेच चित्र
प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात डेंगी व स्वाईन फ्ल्यू रुग्णांचे प्रमाण वाढत असताना जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभाग प्रतिबंधात्मक उपायांसाठी परस्परांवर जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र आहे. प्रतिबंधात्मक उपायांबद्दल पदाधिकारी व सदस्य आरोग्य विभागास जबाबदर धरून वाभाडे काढत आहेत, तर प्रशासनातील अधिकारी गावातील स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीची असल्याचे स्पष्ट करत आहेत. हा गोंधळ दूर करून आरोग्य व ग्रामपंचायत अशा दोन्ही विभागांच्या एकत्रित मोहिमेस चालना देण्याकडे मात्र पदाधिकारी व अधिकारी या दोघांनीही दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, श्रीगोंद्यातील एका महिलेचे स्वाईन फ्ल्यूने, तर गुंडेगावमधील एका मुलाचे डेंगीने काल निधन झाले.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात साथीच्या आजारात वाढ झाली आहे. डेंगी व स्वाईन फ्ल्यूचेही वाढते प्रमाण आहे. या दोन्ही आजारांत तातडीने निदान होत नसल्याने रुग्ण अनेक ठिकाणच्या खासगी दवाखाने व रुग्णालयातून आर्थिकदृष्टय़ा पिळवटला जात आहे. या दोन्ही रुग्णांची प्राथमिक लक्षणे निदर्शनास येताच रुग्णाची माहिती तातडीने सरकारी रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रास कळवावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे, त्यासाठी खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळाही घेतल्या. मात्र, तरीही ही लूट सुरुच आहे.
गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्य़ात डेंगीचे २३ रुग्ण निष्पन्न झाले, त्यातील एकाचा मृत्यू झाला. स्वाईन फ्ल्यूचे संशयीत रुग्ण म्हणून सुमारे साडेतीन हजार जणांची तपासणी करण्यात आली, त्यातील सुमारे ३५० जणांवर संशयीत म्हणून उपचार करण्यात आले, ते बरे झाले, मात्र १४ जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले, त्यातील ४ जणांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेच ही आकडेवारी दिली आहे. या शिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे, पाणी टंचाईमुळे दुषित पाण्यातून उद्भवणाऱ्या विविध साथीच्या आजारांतही वाढ झाली आहे. काल श्रीगोंद्यातील सोनाली सुशांत शिंदे (विसापूर, वय ३२) या महिलेचा स्वाईन फ्ल्यूने निधन झाल्याचा संशय आहे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कारभारी खरात यांनी त्यास दुजोरा दिला. त्याचबरोबर गुंडेगाव (ता. नगर) येथील एका मुलाचा डेंगीने निधन झाल्याची तक्रार सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केली, मात्र त्यास खरात यांनी दुजोरा दिला नाही.
जिल्हा परिषदेच्या गेल्या दोन सर्वसाधारण सभांतून साथीच्या, तसेच डेंगी, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराच्या दुर्लक्षाचे सदस्यांनी वाभाडे काढले. त्याचवेळी दूषित पाणी पुरवठा व गावातील स्वच्छता याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याचे प्रभारी सीईओ रवींद्र पाटील यांनी स्पष्ट केले. जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीच्या सभापती मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा झाली, त्यातही याच वादाच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचे समजले. डेंगीच्या डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणा करते, मात्र दुष्काळी परिस्थितीत कोरडा दिवस पाळणे लोकांना शक्य नसल्याकडे सदस्य लक्ष वेधतात. यातून मार्ग काढण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत, त्यासाठी प्रबोधन होणे आवश्यक आहे. डेंगीचे डास स्वच्छ पाण्यात व घरातच असतात, त्यामुळे ग्रामपंचायतीने धूर फवारणी गल्लीत न करता घरा-घरातून करणे गरजेचे आहे, पाणी शुद्धीकरणाची जबाबदारी ग्रामसेवकाची आहे, अशी आरोग्य विभागाची सूचना आहे. धूर फवारणीसाठी ग्रामपंचायतीकडे साहित्य नाही.
दोन्ही विभागांसाठी स्वतंत्र सूचना होत असल्या तरी दोन्ही विभागांमार्फत एकत्रित मोहीम राबवली जावी, यासाठी पदाधिकारी किंवा अधिकारी मात्र पुढाकार घेताना दिसत नाहीत.    

धूर फवारणीसाठी १० हजार रूपये
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या माध्यमातून धूर फवारणीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १० हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी दिली. तसेच डेंगी रुग्णांसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे व प्राथमिक आरोग्य केंद्रातही सहा खाटा ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. खरात यांनी सांगितले.