संक्षिप्त Print

पोलीस प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
नगर- पोलीस भरतीत पूर्णत: पारदर्शकता असून परिपूर्ण उमेदवारांची निवड केली जाईल, उमेदवारांनी आपल्या जीवनात आयएएस, आयपीएस असे उच्च ध्येय ठेवावे, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व पारदर्शकता असेल तर यश निश्चितच मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केले. राज्य अल्पसंख्यांक आयोग व धन्वंतरी मेडिकल अँड एज्युकेशन फौंडेशन यांच्या वतीने अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. सी. चव्हाण यांनी प्रशिक्षणात अल्पसंख्यांक समाजातील मुलींचा सहभाग वाढावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रशिक्षणार्थीना गणवेश व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सईद अहमद काझी यांनी प्रास्ताविक केले. सचिव रेहान काझी यांनी आभार मानले. यावेळी जयेश पाटील, दानिश काझी, शाहिद काझी आदी उपस्थित होते.
ब्राम्हण वधू-वर मेळावा संपन्न
शुक्ल यजुर्वेदिय महाराष्ट्रीय माध्यंदिन ब्राम्हण समाज संस्थेच्या नगर शाखेने, सर्व शाखीय ब्राम्हण समाजासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे दोनशेहून अधिक सभासदांनी त्यात सहभाग घेतला. पुणे मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष दि. ना. जोशी यांच्या हस्ते सुयोग मंगल कार्यालयात उद्घाटन झाले. सरकारी नोकऱ्यांतील समाजाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक तरुण व्यवसायात स्थिर झाले आहेत, त्यामुळे वधूंनी वर सरकारी नोकरीतीलच हवा अशी अपेक्षा ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. शाखेचे अध्यक्ष मुकुंद ऊर्फ अप्पा मुळे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी शाखेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी नंदकुमार निसळ, सुधीर पाठक, जयंत आयचित्ते, मुकुंद कुलकर्णी, संजय देवचक्के, रमेश देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.
आज मतमाऊलीची यात्रा
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या संत अन्ना चर्च येथील मतमाऊलीची यात्रा उद्या (दि. २७) सायंकाळी होणार आहे. यात्रेसाठी प्रमुख पुरोहित रा. रेव्ह. नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप पुईस डॅनियल उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता पवित्र मरियेचे संगीतमय माळ, सहा वाजता संगीतमय मिस्सा बलिदान आयोजित केल्याची माहिती चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर थॉमस डिकोष्टा यांनी सांगितले. भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.      
कुसूम कुलथे यांचे निधन
 कर्जत/वार्ताहर
तालुक्यातील संघ स्वयंसेवकांची माता म्हणून ओळख असणाऱ्या कुसूम पोपटराव कुलथे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत तालुकाप्रमुख पोपट कुलथे यांच्या त्या पत्नी व प्रसिध्द सराफ अनिल कुलथे यांच्या मातुश्री होत. आज पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संघ परिवार व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.       
मध्यस्थी जागृती अभियान संपन्न
श्रीरामपूर/प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुका विधी सेवा समिती व श्रीरामपूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मध्यस्थी जागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला. श्रीरामपूर न्यायालयाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात न्यायाधीश म. ज. मिर्झा, एस. व्ही. कुलकर्णी, व्ही. व्ही. गायकवाड, श्रीमती एस. एम. पाडोळीकर, ए. डी. तिडके, अ‍ॅडव्होकेट व प्रशिक्षित मध्यस्थ ई. जे. आहेर, श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष बी. एच. ढोकचौळे, तालुका विधी सेवा समितीचे सदस्य अ‍ॅड. विजय बनकर, सहायक सरकारी वकील के. जी. रोकडे, बी. एल. तांबे व पी. एस. वल्टे, तसेच श्रीरामपूर वकील संघाचे सर्व सदस्य, येथील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बनकर यांनी केले. वकील संघाचे सहसचिव तुषार आदीक यांनी आभार मानले.      
‘शुद्रा दी रायझिंग’ प्रदर्शित करण्याची मागणी
श्रीरामपूर/प्रतिनिधी
‘शुद्रा दी रायझिंग’ हा चित्रपट श्रीरामपूरमध्ये लवकरात लवकर प्रदर्शित करावा, या मागणीचे निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी सुहास मापारी यांना देण्यात आले.