काँग्रेसच्या बैठकीत मोदींचा निषेध Print

श्रीरामपूर/प्रतिनिधी
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांच्या कुटुंबियांबद्दल खोटे आरोप करून बदनामीकारक वक्तव्य करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व रामदेवबाबा यांचा श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या बैठकीमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असा ठरावही बैठकीत करण्यात आला.
श्रीरामपूर शहर काँग्रेस कार्यकारिणी व जनसंपर्काची सभा प्रियदर्शनी मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये पक्षाचे शहराध्यक्ष राजन भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सरचिटणीस डॉ. दिलीप शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. काँग्रेस आघाडीच्या केंद्र सरकारने देशभरात २० कोटी आधारकार्डचे नागरिकांना वितरण करून भविष्यात अनुदान व विविध योजनांचा लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे थेट बँकेच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय पंतप्रधान मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनी घेतल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात मंजूर केला. यावेळी झालेल्या चर्चेत सिराज काझी, प्रकाश खोले, पुंडलीक खरे, शहर उपाध्यक्ष रमेश कोठारी, रमेश हरदास, विजय शेलार, गोपाल लिंगायत, नितीन शिरसाठ, रियाज जहागीरदार आदींनी भाग घेतला.