कर्जत-जामखेडमध्ये चढय़ा भावाने गॅस वितरण Print

कर्जत/वार्ताहर
कर्जत व जामखेड तालुक्यातील भारत गॅस कंपनीचे वितरक सुभाष बावर हे प्रत्येक सिलेंडरमागे १७ रूपये जादा घेत आहेत. त्याची तक्रार करूनही या लुटीकडे जिल्हाधिकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार असे संबंधित सर्वच दुर्लक्ष करीत आहेत. जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या व्यापारी आघाडीचे प्रमुख चंद्रकांत भोज यांनी केली आहे.
कर्जत व जामखेड तालुक्यातील भारत गॅस कंपनीची एजन्सी सुभाष बावर यांच्याकडे आहे. त्यांच्याबद्दल पूर्वीपासून विविध तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यांचा सर्व व्यवहार संशयीत आहे. सिलेंडरचा काळाबाजार करून चढय़ा भावात विक्रीच्या गंभीर तक्रारी आहेत. ग्राहकांना पावत्या न देता नंतर पावत्या फाडल्या जातात. जामखेडच्या तहसीलदारांनी मध्यंतरी छापा टाकला, मात्र त्यावर पुढे कारवाई झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजेंद्र कोठारी यांनी नुकतेच तहसीलदारांना या एजन्सीच्या विरूध्द लेखी तक्रार दिली आहे.
सध्या शहरात या एजन्सीने बोगस गॅस कनेक्शन दिल्याचे प्रकार उघड होत आहेत. कर्जत शहरात गॅस सिलेंडर वाटणाऱ्या मुलांना एजन्सी पगार देत नाही. याशिवाय ज्या टेम्पोमध्ये घरपोच सिलेंडर केले जातात त्यांना त्या गाडीचे भाडे व डिझेलदेखील एजन्सी देत नाही तर मग हे कामगार ग्राहकांकडून अडवणूक करून जादा पैसे घेतात.