बांगडीवाला परिवाराच्या वतीने बाल व्यास जयाकिशोरी यांच्या कथा Print

प्रतिनिधी
शहरातील मे. सीताराम बिहाणी (बांगडीवाला) परिवाराच्या वतीने (स्व.) शेठ सुखदेव बिहाणी व (स्व.) शेठ शामसुंदरजी बिहाणी यांच्या स्मृतिनिमित्त दि. ३१ ऑक्टोबर ते २ नाव्हेंबर दरम्यान बाल व्यास जयाकिशोरी यांच्या ‘नानी बाई रो मायरो..’ या धार्मिक कथा आयोजित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्य़ात प्रथमच हा धार्मिक कार्यक्रम होत असल्याची माहिती संयोजक महेश बिहाणी यांनी दिली. ते म्हणाले, श्रीकृष्ण नामाचा प्रसार करणाऱ्या या कथांना राजस्थानमध्ये विशेष धार्मिक महत्व आहे. गुलमोहर रस्त्यावरील आम्रपाली गार्डनमध्ये दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत या कथा सादर केल्या जाणार आहेत. येथे दोन हजार भाविकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्य़ात गेल्या महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. त्यासाठी खास समिती स्थापन करण्यात आली आहे. हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर, हभप जंगले महाराज शास्त्री, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या भगिनी पुष्पा, हभप शिवाजी देशमुख आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असे महेश बिहाणी यांनी सांगितले. सर्वश्री. मोहनलाल मानधना, शामसुंदर सारडा, सुनील मुंदडा, जितेंद्र नरेंद्र व राघवेंद बिहाणी यावेळी उपस्थित होते.