‘ट्रॅफिक जाम’चे नगरला चित्रीकरण सुरू Print

सिंघमफेम अशोक समर्थची मुख्य भूमिका
 प्रतिनिधी
‘ट्रॅफिक जाम’ नावाच्या या चित्रपटाचा मुहूर्त आज सकाळी पाईपलाईन रस्त्यावरील प्रसिध्द शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत पार पडला. ‘सिंघम’ चित्रपटातील ‘शिवा’च्या भुमिकेतून प्रसिद्ध झालेले मराठी रंगभूमीवरचे नामवंत कलाकार अशोक समर्थ यांच्यावर मुहूर्ताचे दृश्य पार पडले. उद्योजक मयूर मिणियार यांनी मोरल ड्रीम प्रोडकशन या संस्थेमार्फत ही सिनेनिर्मिती सुरू केली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पाटील यांनी याची माहिती दिली. मूळचे ते धुळे येथील असले तरी गेली २० वर्षे ते नगरचेच रहिवासी आहेत. लोकलावंतांच्या उपेक्षित जगण्यावर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. एका शिल्पकाराच्या मध्यवर्ती भूमिकेत समर्थ असून प्रमोद कांबळे आता ‘चित्रपट कलावंत’ अशा नव्याच भूमिकेतून समोर येत आहे. शिल्पकाराच्या वडिलांची भूमिका प्रमोद करत आहेत असे पाटील यांनी सांगितले. त्यांच्याशिवाय नगरचे आणखी काही कलाकार चित्रपटात असतील. शीतल पाठक या मुंबईतील अभिनेत्री नायिकेच्या भूमिकेत आहेत.
मुहूर्ताच्या कार्यक्रमाला स्वत: पाटील, प्रमोद कांबळे, तसेच निर्माते मयुर मिणियार, मार्गदर्शक तथा उद्योजक रामेश्वर मिणियार, परितोष प्रधान, जया मदीगोंडा, प्रकाश धोत्रे आदी उपस्थित होते. कथा सुचित पाटील यांची असून संवाद प्रवीण खैरनार यांचे आहे. नगरचेच बाबासाहेब सौदागर व आशिष निगुरकर यांची गीतरचना आहे. माणिकबाबा संगीतकार म्हणून आहेत.
लोककलावंत हळूहळू लुप्त होत चालले आहेत. रोजच्या धावपळीच्या जगण्यात त्यांच्या कलेला दाद देणारे कोणी राहिलेच नाहीत. या कलांचे पुनरुज्जीवन होऊ शकते, असा संदेश या चित्रपटातून देण्यात येत आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. चित्रपटाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. नगरमध्ये विविध ठिकाणी १५ दिवसांचे चित्रीकरण आहे. त्यानंतर पुणे व अन्य ठिकाणी चित्रीकरण होईल. साधारण २६ जानेवारीच्या सुमारास चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे.