राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दि. ३०ला निदर्शने Print

प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३० ऑक्टोबरला निदर्शने करून लक्षवेध दिन पाळण्यात येणार आहे.
संघटनेचे राज्याध्यक्ष योगीराज खोंडे यांनी ही माहिती दिली. राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व अन्य संघटनांनीही या निदर्शनांना जाहीर पाठिंबा दिला आहे, असे खोंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी १३ डिसेंबर २०११ ला केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. दिवाळी आली तरीही १ जुलै २०१२ पासूनचा ७ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नाही. तसेच ३५ महिन्यांची थकबाकी देण्याबाबतही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याचा निषेध, तसेच या दिरंगाईकडे लक्ष वेधण्याचा मार्ग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व सरकारी अधिकारी ३० ऑक्टोबरला निदर्शने करतील, असे खोंडे यांनी सांगितले.