डासांची उत्पत्ती थांबवण्याऐवजी केवळ धूर फवारणी Print

मनपाचे ‘आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी’
 प्रतिनिधी
सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत महापालिकेचे आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी असे सुरू आहे. डासांची उत्पतीच थांबवणारे अ‍ॅबट हे औषध वापरायचे सोडून डासांना निव्वळ गुंगी आणणारी धूर फवारणीच सर्वत्र सुरू आहे. नगरसेवकही आपापल्या प्रभागात ही अनावश्यक व प्रदूषण करणारी फवारणी व्हावी यासाठी आरोग्य विभागात खेटे घालत आहेत.
स्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या व अत्यंत धोकादायक अशा डेंगी, चिकुनगुण्यासारख्या आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांना रोखण्यासाठी अ‍ॅबट हे औषध सर्वत्र वापरले जाते. द्रव्य स्वरूपातील या औषधाचे दोनतीन थेंब स्वच्छ पाण्यात (घराजवळ साचलेले, जुन्या टायरमध्ये, पन्हाळीत अडकून राहिलेले, ड्रममध्ये, भांडय़ात असलेले पाणी) टाकले की या पाण्यात वाढणाऱ्या डासांना प्रतिबंध होतो. डास असतील तर ते मरतात, त्यांच्या अळ्या असतील तर त्यातून काहीच निष्पती होत नाही, त्यामुळे नवे डास तयारच होत नाहीत. काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात ही साथ आली होती त्यावेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने फार प्रभावीपणे या औषधाचा प्रचार व वापर केला होता.
मनपाच्या आरोग्य विभागात मात्र या औषधाचे कोणी नावही घेत नाही. शहरात साथीच्या आजारांचा प्रार्दुभाव झाल्याची ओरड होताच धूर फवारणी करणारी यंत्रे घेण्यात आली. अशी १६ यंत्रे घेतली आहेत. त्यातून औषधाची फवारणी करण्यासाठी १६ व त्यांची सुटीच्या दिवशी असावेत म्हणून आणखी १६ अशा ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हातात धूर फवारणी करणारे यंत्र घेऊन मागणी आली की लगेचच त्या परिसरात धूर फवारणी असा प्रकार सुरू आहे. या धुराने डासांना फक्त गुंगी येते. काही कालावधीसाठी त्यांचे फिरणे, उडणे, गुणगुण करणे बंद होते. औषधाचा प्रभाव संपला की हे डास पुन्हा तरतरीत होतात. अ‍ॅबट औषध याच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रभावी व विशेष म्हणजे स्वस्त पडत असतानाही त्याचे मात्र नावही घेतले जात नाही.
साठलेल्या पाण्यातून डासांची उत्पती होते त्याचप्रमाणे खासगी, तसेच सार्वजनिक शौचालये, रस्त्यांच्या कडेला वाढणारे गवत, कचऱ्यांचे ढिग यातूनही डास तयार होतात. सार्वजनिक स्वरूपाची ही स्वच्छता मनपानेच करणे गरजेचे आहे. तसे न करता मनपाने नागरिकांनी वैयक्तीक स्वरूपात काय उपाययोजना कराव्यात याची जाहीरात केली. गवत काढणे, शौचालयांमधून बाहेर निघालेल्या पाईपना जाळ्या बसवणे या कामांकडे मात्र त्यांचे दुर्लक्षच झाले आहे. काही वर्षांपूर्वी मनपानेच अशा जाळ्या खरेदी करून त्या पाईपना बसवल्या होत्या. त्यामुळे डासांचे त्या पाईपमधून जाणेयेणे थांबते व त्यांची वाढही खुंटते, त्यांना आपोआपच आळा बसतो.
दरम्यान, धूर फवारणीसाठी नगरसेवकांची, तसेच काही भागांमधील नागरिकांकडूनही जोरदार मागणी सुरू झाली आहे. काहींनी तर त्याचीही छायाचित्रांसह जाहीरात करण्यास सुरूवात केली आहे. या मागणीमुळे आता धूर फवारणीचे वेळापत्रक कोलमडले असून मागणी येईल तिकडे त्वरित जा, असे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.