विवाहितेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न Print

पेटवताना पतीही भाजला
 श्रीरामपूर/प्रतिनिधी
शहरालगत असणऱ्या टिळकनगर परिसरात हनुमानवाडी येथील जयश्री गणेश जाधव या तरूणीस तिची सासू व नवऱ्याने रॉकेल टाकून पेटवून दिले. यात ही महिला गंभीररित्या भाजली असून पेटवून देणारा नवराही भाजला आहे. ही खळबळजनक घटना गुरूवारी दुपारी दीड वाजता घडली.
या प्रकारात जयश्री ६५ टक्के व तिचा नवरा गणेश ३४ टक्के भाजला आहे, अशी माहिती साखर कामगार रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगधने यांनी दिली.
दरम्यान, जयश्री हिने यासंबंधात श्रीरामपूर शहर पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास नवरा गणेश याच्याशी वेगळे राहण्यावरून भांडण चालू होते. सासू कमल दत्तात्रय जाधव यावेळीच तेथे आल्या. त्यांनी सर्व इस्टेट मोठय़ा मुलाची आहे, तुझा काही संबंध नाही असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी नवरा गणेश जाधव याने ५ लिटर रॉकेलचा ड्रम जयश्रीच्या अंगावर ओतला. सासू कमल हिने दोन्ही हात दाबून धरले व तिला नवऱ्याने पेटवून दिले. या गडबडीत नवरा गणेश हाही पेटला. दोघांना साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले. जयश्रीने पुढे म्हटले आहे की, नणंद सगुना कैलास फटांगरे (रा. संगमनेर) ही माहेरी आली की शिवागाळ करून शारिरीक व मानसिक छळ करायची.
वरील फिर्यादीवरून जयश्री हिचा नवरा गणेश, सासू कमल, नणंद सगुना फटांगरे यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०७, ४९८ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.