कर्जतसाठी कुकडीतून पाण्याची मागणी Print

आ. शिंदे यांचे निवेदन
 प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तालुक्यातील पाझर तलाव कुकडीचे पाणी सोडून भरले तर ही टंचाई दूर होईल, त्यामुळे कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्याकडे केली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आमदार शिंदे यांचे निवेदन स्वीकारले. तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला. खरिपाची पिके पूर्ण वाया गेली व रब्बीची पेरणीही पावसाअभावी फार कमी झाली आहे. त्यामुळे सध्या ५१ टँकरद्वारे ४७ गावे व २१० वाडय़ा-वस्त्यांना पाणी पुरवले जाते. रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या ८ हजार आहे. यावरून तालुक्यातील दुष्काळ किती दाहक आहे याची कल्पना येते, असे आमदार शिंदे यांनी म्हटले आहे.
कुकडीचे पाणी सोडले तर त्याचा किमान २७ पाझर तलावांना फायदा होईल. या २७ तलावांमधून अनेक गावे व वाडय़ा वस्त्यांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पर्यायाने त्या भागातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे कुकडीतून नगरला पाणी सोडण्याचा प्रस्ताव त्वरित सरकारला पाठवावा, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित मंत्रालय व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आश्वासन त्यांना दिले.