जायकवाडीत आता निळवंडेतून पाणी Print

भंडारदराचा विसर्ग थांबवला
 अकोले/वार्ताहर
भंडारदरा, निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा अंतिम टप्पा आज सुरू झाला. आज दुपारी भंडारदऱ्यातून पाणी सोडणे पूर्णपणे थांबविण्यात आले. भंडारदऱ्यातून २ हजार ११७ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले असून उर्वरित पाणी आता निळवंडेतून सोडणार असल्याचे समजते. बहुदा दोन दिवस त्यासाठी लागतील. मात्र, प्रवरेचा विसर्ग या काळात दोन हजार क्सुसेक्सपेक्षा कमी राहणार आहे.
भंडारदऱ्यातून दि. २१ पासून स्पील वेमधून ५ हजार क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने पाणी सोडण्यात आले. काल (गुरूवारी) पाणी बंद करण्यात आले होते, परंतु सायंकाळी पुन्हा ते सुरू करण्यात आले. शेवटी आज सकाळी सात वाजत स्पील वेमधून पाणी बंद करण्यात आले, तर दुपारी २ वाजता वीजनिर्मिती केंद्रातून सुरू असणारा ८३० क्युसेक्सचा विसर्गही बंद करण्यात आला. त्यावेळी भंडारदऱ्यातील पाणीसाठा ८ हजार ७६६ दशलक्ष घनफूट होता. गत सहा दिवसांत २ हजार ११७ दशलक्ष घनफूट पाणी सोडल्याने नऊ फुटांनी धरणाची पाणीपातळी कमी झाली आहे. जायकवाडीसाठी अडीच टीएमसी पाणी सोडायचे असून उर्वरित ४०० दशलक्ष घनफूट पाणी आता निळवंडेतून सोडण्यात येणार असल्याचे समजते.
निळवंडेत यावर्षी ४ हजार ७३२ दशलक्ष घनफूट साठा करण्यात आला आहे. आज दुपारी बारा वाजता निळवंडेच्या सांडव्यावरून २ हजार २५९ क्युसेक्सने पाणी प्रवरा पात्रात पडत होते, तर धरणाच्या मोरीतून १ हजार ७७९ क्युसेक्स विसर्ग सुरू होता. निळवंडय़ातील पाणीपातळी जशी कमी होईल तसा हा वेगही कमी होणार आहे. नंतर फक्त मोरीद्वारे साडेसतराशे क्युसेक्सचा विसर्ग पुढील दोन दिवस सुरू राहील. १८० किलोमीटरच्या प्रवरा
पात्रात सध्या ५ हजार क्युसेक्सपेक्षा अधिन वेगाने पाणी जात असून पुढील तीन दिवसांत ते जायकवाडीत जमा होईल.