एफडीआय देशात क्रांती घडवेल- थोरात Print

प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीमुळे (एफडीआय) देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याने काँग्रेस सरकारचा हा निर्णय क्रांतीकारी आहे. विरोधक केवळ राजकीय कारणातून त्यास विरोध करत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
या निर्णयाच्या समर्थनासाठी प्रदेश काँग्रेसने सुरू केलेल्या नागरिकांच्या सह्य़ांच्या मोहिमेची सुरूवात आज सकाळी सरकारी विश्रामगृहात थोरात यांच्या हस्ते अर्जावर स्वाक्षरी करुन करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्य़ातून सुमारे दीड लाख सह्य़ांचे व राज्यातून सुमारे २५ लाख सह्य़ांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी आज तालुकाध्यक्षांना अर्ज देण्यात आले. पंतप्रधान मनमोहनसिंग अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांनी खुले आर्थिक धोरण स्वीकारुन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली. त्यांनी जे जे निर्णय घेतले, त्या सर्वाना विरोधकांनी विरोध केला, मात्र तेच आज त्याची फळे चाखत आहेत. देशाची जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे, चिनसारखा कडवा डाव्या विचारांचा देशही खुल्या अर्थव्यवस्थेमुळेच महासत्ता होत आहे. एफडीआयमुळे देशातील शेतकरी, ग्राहक अशा सर्वाचाच फायदा होणार आहे, शिवाय दर्जेदार उत्पादनेही स्वस्तात मिळतील, असा दावाही थोरात यांनी केला. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी समर्थन मोहिमेची माहिती दिली. राज्य-केंद्र योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख यांनी प्रास्ताविक केले. माजी खासदार दादा पाटील शेळके, भास्करराव डिक्कर, बाळासाहेब हराळ, धनंजय जाधव, संपत म्हस्के, अनंत देसाई, ब्रिजलाल सारडा, उबेद शेख, निखिल वारे, दीप चव्हाण, तसेच तालुकाध्यक्ष उपस्थित होते.    

  चर्चा सवता-सुभ्याची
काँग्रेसच्या आजच्या सभेची कार्यकर्त्यांना माहिती नव्हती. निमंत्रणही मिळाले नाही, अशी शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांची तक्रार होती. पक्षाच्या जिल्हा संघटनेच्या वतीने मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला तरी प्रत्यक्षात केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वीच बैठक घेऊन त्याची सुरुवात केली, या समितीच्या वतीने मोहिमेसाठी देशमुख यांनी आता जिल्हा संघटनेव्यतिरिक्त स्वतंत्र तालुका दौरे आयोजित करणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे देशमुख यांच्या ‘सवता सुभ्या’कडे पक्षातीलच पदाधिकारी कुजबुजीच्या स्वरुपात लक्ष वेधत होते. उद्या (शनिवारी) जामखेड, कर्जत व श्रीगोंदे, रविवारी नगर तालुका, राहुरी व नेवासे येथे समितीच्या बैठका होणार आहेत.