औद्योगिक वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा Print

प्रतिनिधी
महावितरण कंपनीने औद्योगिक क्षेत्रासाठी अचानक लागू केलेल्या वीज दरवाढीच्या विरोधात नगरमधील उद्योजकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. वीज दरवाढीच्या विरोधात नगरचे उद्योजक मंगळवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी व महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.
असोशिएशन ऑफ अहमदनगर मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीजच्या (आमी) काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे, संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने काल महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. वीज दरवाढीच्या विरोधात दोन दिवसांपुर्वी राज्यातील उद्योजकांनी बंद पुकारला होता, त्यात नगरचे उद्योजक सहभागी झाले नव्हते. ‘आमी’ संघटनेच्या बैठकीत दरवाढीबद्दल महावितरणचा निषेध करण्यात आला. या दरवाढीमुळे उद्योजक हवालदिल झाल्याने लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वीज दरवाढीबरोबरच एमआयडीसीतील विस्कळीत पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था व बंद असणारे पथदिवे यासाठी सोमवारी (दि. २९) सायंकाळी एमआयडीसीच्या कार्यालयात जाऊन उद्योजक अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. प्रश्नांची तड लावण्यासाठी उद्योजकांनी उपस्थित राहण्याचे अवाहन सोनवणे, दौलतराव शिंदे, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र कटारिया आदींनी केले आहे. गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी नगरच्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वच रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केल्याची माहिती दिली होती.