गडकरींवरील आरोपांच्या कोणत्याही चौकशीस भाजप तयार- खडसे Print

राहाता/ वार्ताहर
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत पक्ष कोणात्याही चौकशीस तयार आहे. काँग्रेस पक्ष मात्र रॉबर्ट वढेरांच्या चौकशीची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलतांना केला.
धनगर समाज हक्क परिषदेनंतर पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले, गडकरी यांची खाजगी कंपनी असल्याने त्यांचा विषय वैयक्तीक असला तरी सरकारने आयकर विभाग, कपंनी कायदा, गुप्तचर विभाग या कोणत्याही यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी. या चौकशीचे भाजप स्वागतच करेल. मात्र केंद्रातील पंधरा मंत्र्यावर आरोप असतानाही त्यांची चौकशी करण्याची सत्ताधारी काँग्रेस सरकारने तत्परता दाखविली नाही. गोपीनाथ मुंडे आमचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी दिली आहे. त्यात काहीही गैर नाही. भाजपमध्ये सामुहीक नेतृत्वाची प्रक्रिया असल्याने मुंडे यांच्याकडेच राज्याचा कारभार द्यावा अशी आमची मागणी होती. राज्य व केंद्र सरकार सवंदेना हरवून बसले आहे. राज्याच्या सत्तेत असलेले काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्रीच एकमेकांवर आरोप करुन आम्हाला आरोप करण्याची संधी देत आहेत, त्याचा आम्ही फायदा उठवणारच. राज्यावर २ लाख ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. हे कर्ज सरकारधील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे झालेले आहे. त्यास आघाडी सरकार जबाबदार आहे. अनुदानाचे सातवे सिलेंडर देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत आहे. सरकारी तिजोरीतील पैसा भ्रष्टाचारात बुडाला असल्याचा आरोप खडसे यांनी केला.