१ ते ८ नाव्हेंबर दरम्यान वारकरी संघाचा अखंड हरिनाम सप्ताह Print

प्रतिनिधी
जिल्हा वारकरी सेवा संघाच्या वतीने दि. १ ते ८ नोव्हेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा निष्काम कर्मयोगी पुरस्कार स्नेहालयला देण्यात येणार आहे. संघाचे अध्यक्ष हभप विश्वनाथ राऊत यांनी ही माहिती दिली.
यंदाही बडी साजन सांस्कृतिक भवनात हा सोहळा होणार आहे. राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्य़ातील वारकरी मंडळी वर्षभरातुन एकदा एकत्र यावी या हेतुने हा सोहळा सुरू करण्यात आला असुन यंदाचे हे बारावे वर्ष आहे. सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे काकड आरती, सामुहिक ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकिर्तन होणार आहे. हभप बाळकृष्ण महाराज भोंदे व हभप पंढरीनाथ महाराज देवकर ज्ञानेश्वरी सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व करणार आहेत. बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांची निवासाची तसेच सर्वाची दररोज अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते दि. १ ला सायंकाळी ६ वाजता सोहळ्याचे उदघाटन होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. याच वेळी पुरस्कार वितरण होईल. पहिल्या दिवशी (दि. १) रात्री ८ ते १० या वेळेत हभप रामराव महराज ढोक यांचे किर्तन होणार आहे. त्यानंतर दररोज अनुक्रमे हभप लक्ष्मण महाराज कोकाटे, हभप भास्करगिरी महाराज, हभप जयवंत महाराज बोधले, हभप बबन महाराज बहिरवाल, हभप प्रकाश महाराज जवंजाळ व हभप भरत महाराज पाटील यांची किर्तने होणार आहेत. दि. ७ ला शहरातुन दिंडी काढण्यात येणार आहे. दि. ८ ला हभप अमृत महाराज जोशी (बीड) यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल अशी माहिती राऊत यांनी दिली. भाविकांनी या सोहळ्यास सढळ हाताने मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. संघाटे विश्वस्त संजय चोपडा, विजयशंकर मिश्रा, विठ्ठलदास बाफना आदी यावेळी उपस्थित होते.