धूम स्टाईल दागिने चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरांना अटक Print

भाजप पदाधिकाऱ्याचा मुलगाही सहभागी
 प्रतिनिधी, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावुन पळ काढणाऱ्या दोघा अल्पवयीन चोरटय़ांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका माजी शहराध्यक्षाच्या मुलाचा समावेश आहे.

या पदाधिकाऱ्याच्या घरातुनच पोलिसांनी, त्याच्या मुलाने चोरलेले दागिने व एक मोटरसायकल असा सुमारे १ लाख २० हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला.
या चोरीत भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याचा मुलाचा समावेश असल्याचे उघड झाल्याने पक्षासह शहरातही खळबळ उडाली आहे. पकडलेल्या दोघांना पोलीस उद्या (रविवार) बाल गुन्हेगार विषयक न्यायालयात हजर करणार आहेत.
भाजपचा हा पदाधिकारी मुळ माळीवाडा परिसरात वास्तव्यास असला तरी तो रेल्वे स्टेशन परिसरात राहतो. त्याच्या मुलाबरोबर अटक केलेला दुसरा चोरटाही त्याच्याच कॉलनीत रहातो. या दोघांनी औरंगाबाद रस्त्यावरील लष्कराच्या बीटीआर केंद्रासमोरहुन दुचाकीवर चाललेल्या दोन महिलांच्या गल्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन पळ काढला होता. दुसऱ्या एका घटनेत प्रोफेसर कॉलनी चौकात पायी चालणाऱ्या पती-पत्नीस धक्का देऊन या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र पळवले होते. दोन्ही घटनांची कबुली दोघांनी दिली आहे, तरीही पोलिसांना या दोघांनी आणखी काही धुमस्टाईल चोऱ्या केल्याचा संशय वाटतो. दोघांना पकडल्यानंतर त्यांनी सराफ व्यावसायिकास विकलेले तसेच पदाधिकाऱ्याच्या घरातुन मिळालेले असे एकुण ८० हजार रुपये किंमतीचे दागिने व क्रमांक नसलेली मोटारसायकल असा एकुण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. घरातुनच दागिने जप्त केल्याने या पदाधिकाऱ्याने पोलीस पथकासमोर शांत राहणेच पसंत केले, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना या चोरटय़ांबाबत माहिती समजली होती, त्यांच्या सुचनेनुसार शाखेचे निरीक्षक प्रदिप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भालेराव, कृष्णा वाघमारे, प्रसाद भिंगारदिवे, अरुण वाघमारे, जयवंत तोडमल,  सचिन भिसे, उमेश खेडकर, जोसेफ साळवी, सजिन जाधव यांच्या पथकाने सापळा रचुन दोघांना पकडले.     

हाती लागले ‘बेंटेक्स’
या अल्पवयीन चोरटय़ांनी धुम स्टाईल चोऱ्यांची सुरुवातच कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन केली. या दोन्ही चोऱ्यांत दोन मंगळसुत्रे हाती लागली, परंतु ही दोन्ही मंगळसुत्रे ‘बेंन्टेक्स’ची निघाली. त्यामुळे या दोघांनीही अशा प्रकारच्या वारंवार घटना घडणाऱ्या सावेडी परिसराकडे आपला मोर्चा वळवल्याचे पोलीस सुत्रांकडुन समजले.