बोनसच्या प्रश्नावर मनपात आज बैठक Print

प्रतिनिधी
महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या प्रश्नावर कर्मचारी युनियन व प्रशासन यांच्यात उद्या (मंगळवार) दुपारी ४ वाजता बैठक होणार आहे. युनियनने या विषयावर उद्यापासून धरणे आंदोलन सुरू करण्याची नोटीस प्रशासनाला दिली होती. बैठकीमुळे हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.
जकात बंद होऊन स्थानिक संस्था कर सुरू झाला आहे. त्याची वसुली यथातथाच आहे. मालमत्ता कराची वसुलीही चांगली नाही. पारगमन कर सुरू आहे, मात्र त्याचे उत्पन्न पाणी बील, वीज बील असा अत्यावश्यक खर्च करण्यात जात आहे. त्यामुळे मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली असून त्यातच आता कर्मचारी युनियनने बोनसची मागणी केल्यामुळे प्रशासन हबकले आहे. काहीही केले तरी त्यांच्यासाठी किमान १ कोटी रूपये लागतील व ती व्यवस्था करणे आताच्या परिस्थितीत मनपाच्या आवाक्याबाहेर आहे.
युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले की प्रशासन दरवर्षी हा मुद्दा उपस्थित करते. दिवाळीसाठी कामगारांना बोनस द्यावा लागेल हे माहिती असूनही त्याचे नियोजन केले जात नाही. वर्षांच्या सुरूवातीलाच ते केले तर ही अडचण येणार नाही. अधिकारी नियोजन करत नाहीत हा कर्मचाऱ्यांचा दोष नाही. त्यामुळे पैसे नाहीत हे कारण अयोग्य आहे. उद्या चर्चेसाठी बैठक होणार आहे. त्यात युनियन बोनसच्या विषयावर आग्रहीच राहील, असे लोखंडे यांनी सांगितले.