लोकशासन संघटनेचा कर्जतला मोर्चा Print

कर्जत/वार्ताहर
लोकशासन संघटनेच्या वतीने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला दुपारी अक्काबाई मंदिरापासून सुरुवात झाली. शहरातून मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यावर तेथे जाहीर सभा झाली. यावेळी कोळसे म्हणाले की, आज देशातील सरकार गोरगरीब जनतेचे शोषण करीत आहे. हा देश अमेरिकेसारख्या देशाचा पुन्हा गुलाम होणार आहे. तशी वाटचाल केंद्र सरकारची सुरू आहे. मूठभर लोकांनी देशाची अर्थव्यवस्था ताब्यात घेतली आहे, असा आरोप कोळसे करून ते  म्हणाले की आता माघार नाही. राज्यात आम्ही दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या नावनोंदणीसाठी सुमारे एक लाख अर्ज भरले आहेत. यापुढील आंदोलन मुंबईला होईल. तेथे आझाद मैदानावर राज्यातील सर्व गोरगरीब जनता चुली घेऊन मागण्या मान्य होईपर्यंत सरकाला धारेवर धरणार आहेत. बाबूशाही व सरकार यांना वठणीवर आणण्यासाठी केवळ न्यायालय हाच अंतिम पर्याय असल्याने त्यांनी सांगितले.
महिला राज्य संघटक मिरा शिंदे म्हणाल्या की, आज देशात लोकशाही केवळ पुस्कात शिकवण्यापुरती उरली आहे. मतदारांना फक्त मत देण्यापुरताच अधिकार राहिला आहे. जे नोकर म्हणून निवडून दिले तेच मालक झाले आहेत. सरकारी कर्मचारी ज्या प्रमाणे पगार घेतात तसाच पगार आमदार व खासदार घेतात, मग दोघेही नोकरच होतात. आता देशात पुन्हा एकदा क्रांती होण्याची गरज आहे
मोर्चात राजेंद्र निंबाळकर, राजेंद्र गायकवाड, नवनाथ तनपुरे, उज्वला कवळे, सुजाता सोमवंशी यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.