बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण Print

प्रतिनिधी
भारत संचार निगममध्ये (बीएसएनएल) मोक्याच्या जागांवर गेली १२ वर्षे ठाण मांडून बसलेल्या भारतीय दूरसंचार सेवा वर्गातील (आयटीएस) अधिकाऱ्यांना परत त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवावे अथवा महामंडळात वर्ग करावे या मागणीसाठी सर्व कर्मचारी संघटनांनी आजपासून देशभर संयुक्त साखळी उपोषण सुरू केले. नगरमध्येही सर्व संघटनांचे पदाधिकारी उपोषणाला बसले असून उद्या (मंगळवार) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
संघटनांच्या संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी एस. के. घुगे, अप्पासाहेब गागरे, एच. आर. गोपाळघरे, ए. पी. गायकवाड, बी. डी. महानूर, बी. टी. रासकर, लाला शेख, सुभाष धामणे, विलास साळवे, रमेश शिंदे, विजय शिपणकर, आर. के. चौरे, बी. एस. ठुबे, सुधाकर थोरात, वि. प्र. नगरकर आदी उपोषणात सहभागी झाले होते.
दूरसंचार सेवेची बीएसएनएल कंपनी केली त्यावेळी सर्व आयटीएस मधील वरिष्ठ अधिकारी वगळता अन्य सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना कंपनीत म्हणजे निगममध्ये सामावून घेण्यात आले. त्यामुळे आयटीएसच्या अधिकाऱ्यांना कंपनी एकप्रकारे पोसते आहे. त्यांच्याकडून कर्मचारी हिताचे निर्णय तर होतच नाहीत, शिवाय कंपनीही तोटय़ात येईल, असे निर्णय ते सातत्याने घेत आहेत. यासंदर्भात संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यात न्यायालयाने त्यांना कंपनीत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ३० सप्टेंबर २०१२ ही मुदतही दिली होती. मात्र, ही मुदत संपूनही ही कार्यवाही झाली नाही.