स्वत:चा छापखाना असताना जि. प.ची बाहेरून छपाई Print

सदस्यांचा आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचा स्वतंत्र छपाई विभाग असताना लाखो रुपयांच्या छपाईची कामे बाहेरुन का केली जातात, असा प्रश्न उपस्थित करत अर्थ समितीच्या सभेत आज जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी छपाई विभाग पूर्ण क्षमतेने चालवा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला. अर्थ समितीत काही अर्थ नाही, साराच अनर्थ आहे, असा उद्वेगही सदस्यांनी प्रकट केला.
अर्थ समितीची सभा आज समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांच्या अनुपस्थितीमुळे विश्वनाथ कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. छपाई विभाग (प्रिंटिंग प्रेस) पूर्ण क्षमतेने चालवा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा सदस्य परमवीर पांडुळे (काँग्रेस), अशोक आहुजा (भाजप) व दत्तात्रेय सदाफुले (शिवसेना) यांनी दिला.
पांडुळे यांनी छपाई विभागाची माहिती मागवणारी व तो पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आंदोलनाचा इशारा देणारी नोटीसही प्रशासनास दिली होती. मात्र, त्याचे ठोस उत्तर त्यांना मिळाले नव्हते. त्यामुळे आजच्या सभेत त्यांनी पुन्हा हा विषय उपस्थित केला. त्यास अहुजा व सदाफुले यांनीही साथ दिली. अर्थ विभागाचे पदाधिकारी व अधिकारी विश्वासात घेत नाहीत, ८-९ महिन्यांचा कालावधी लोटला तरीही कोणत्याही योजनांची माहिती दिली जात नाही, पदाधिकारी व अधिकारी देत असलेल्या माहितीत विसंगती असते, अशी नाराजी व्यक्त करत सदस्यांनी व्यक्त केली. सभेस सदस्य वैजयंती धनवटे, संध्या राळेभात, कालिंदी लामखेडे, उषा अकोलकर, सचिव तथा कॅफो कृष्णराव साळुंखे आदी उपस्थित होते.