‘बंद कारखाने चालवून तीन-चार हजारांचा भाव द्या’ Print

कृषिमंत्री विखे यांचे शेतकरी संघटनेला आव्हान
 राहाता/वार्ताहर
राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने शेतकरी संघटनेने चालवायला घेऊन सभासदांना तीन ते चार हजार रुपये टनाप्रमाणे पहिला हप्ता द्यावा, असे आव्हान राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.
विखे म्हणाले, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते लोकांशी भावनिक राजकारण करुन, त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सहकारी साखर कारखानदारी संक्रमणातून वाटचाल करीत असून, कारखानदारी चालविणे सोपी गोष्ट नाही. शेतकऱ्यांना ऊस भाव देण्याबाबत कुणाचे दुमत नाही, परंतु शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस भावाच्या माध्यमातून कारखानदारी अडचणीत आणण्याचाच प्रयत्न करीत आहेत.
काही लोकांनी सहकारी साखर कारखाने बंद करुन खासगी साखर कारखाने सुरू केले, त्याला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला का, असा प्रश्न करुन विखे म्हणाले, शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आपला विरोध नाही. परंतु त्यांनीही केव्हातरी कारखानदारी चालवून दाखवावी.
लोकांच्या प्रपंचाचा शिमगा करू नका. परिस्थितीच्या विरुद्ध झगडा देऊन सहकारी साखर कारखानदारी चालवावी लागते. साखरेच्या भावात चढउतार चालू असतात. अर्थकारण बिघडले तर कारखान्यावर कर्ज वाढण्याची शक्यता असते. कारखान्यावर कर्ज वाढले तर हीच मंडळी टाहो फोडतात, असे त्यांनी सांगितले.
सहकारी साखर कारखानदारीच्या कर्जाला सरकारला हमी द्यावी लागणार आहे. परंतु त्यास मंत्रिमंडळातील काही मित्र विरोध करीत आहेत. विरोध करणारांनी सहकारी साखर कारखाने मोडून खासगी साखर कारखाने काढले असले तरी सहकारी साखर कारखान्यांची पाठराखण करण्याचे दायित्व सरकारचे आहे, असे सांगून विखे म्हणाले, राजकारणात पदापेक्षा आपल्याला शेतकऱ्यांचे संरक्षण करणे महत्वाचे वाटते. पाण्याच्या बाबतीत काही लोकांनी गप्प बसण्याची भूमिका घेतली.
भंडारदऱ्याचे पाणी जायकवाडीला सोडण्यात एका राजकीय पक्षाने मोठी भूमिका वठवत राजकीय कट केला. औरंगाबाद महापालिकेच्या वितरण व्यवस्थेत ४० टक्के पाण्याची गळती आहे.
पाणीगळती असल्याने महापालिका बरखास्त करा, अशी मागणी त्यांनी केली. वास्तविक जायकवाडी धरणात २६ टीएमसी पाणी असतानाही त्याचा वापर न करता केवळ नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याची भूमिका एका राजकीय पक्षाने घेतल्याची टीका त्यांनी केली.