एलबीटी चुकवलेल्या १२ व्यापाऱ्यांचा माल जप्त Print

प्रतिनिधी
आर्थिक डोलारा कोसळू लागल्याने महापालिकेने आता स्थानिक संस्था कर (एलबीटी) चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कारवाईस सुरूवात केली. स्वत: उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे सहभागी झालेल्या आजच्या मोहिमेत अशा सुमारे १२ व्यापाऱ्यांचा काही लाख रूपयांचा माल पकडून जप्त करण्यात आला व त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
पुणे नाक्यावर सकाळी १० वाजताच ही कारवाई करण्यात आली. डॉ. डोईफोडे, तसेच एलबीटी अधिकारी दिनेश गांधी, जकात अधीक्षक अशोक साबळे, कार्यालयीन अधिकारी जितेंद्र सारसर, तसेच कैलास भोसले, खताळ, बारस्कर आदींच्या पथकाने पुणे नाक्यावर थांबून मालवाहतूक करणाऱ्या गाडय़ा तपासण्यास सुरूवात केली. त्यात ज्या व्यापाऱ्यांनी एलबीटी अंतर्गत नोंदणी केली होती त्यांचा माल वगळता अन्य व्यापाऱ्यांचा माल थेट जप्त करण्यात आला.
सुमारे १२ व्यापारी मनपाकडे नोंदणी न करता ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून आपला माल शहरात आणत असल्याचे या कारवाईत आढळले. त्यांचा सर्व माल गाडय़ांमधून उतरवून घेण्यात आला व जप्त करून मध्यवर्ती गोदामात जमा करण्यात आला. ज्यांनी नोंदणी केली आहे, मात्र मालाची किंमत कमी दाखवली अशाही काही व्यापाऱ्यांचा माल यात जप्त करण्यात आला. व्यापाऱ्यांची नावे समजू शकली नाहीत, मात्र त्यात शहरातील काही नामवंत व्यापारी असून कापड, खेळणी अशा प्रकारचा हा माल असल्याचे समजले.